शिंदे गटाचे आमदार डाॅ. बालाजी किणीकर यांचा पीए शशिकांत साठेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 08:39 AM2023-08-20T08:39:20+5:302023-08-20T08:39:59+5:30
ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण, पाच दिवसांची पोलिस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: नंदू ननावरे पती-पत्नीच्या आत्महत्येला तीन आठवड्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार डाॅ. बालाजी किणीकर यांचे स्वीय सहायक शशिकांत साठे, पप्पू कलानी यांचे कट्टर समर्थक कमलेश निकम, नरेश गायकवाड व गणपती कांबळे यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रमुख मालोजी शिंदे यांनी दिली.
ननावरे यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ काढून आत्महत्येस रणजितसिंह नाईक-निंबाळकर, संग्राम निकाळजे आणि दोघा देशमुख वकील बंधूंना जबाबदार धरल्याचा उल्लेख केल्याने विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी त्यांना अटक केलेली नाही. ननावरे आत्महत्येच्या तपासाला गती प्राप्त होत नसल्याच्या निषेधार्थ भाऊ धनंजय ननावरे यांनी हाताचे बोट कापून गृहमंत्र्यांना भेट देणार असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यावर, पोलिसांनी मूळ एफआरआयमध्ये नाव नसलेल्या साठे, निकम यांच्यासह चौघांना अटक केली.
उल्हासनगर कॅम्प नं-४, आशेळेपाडा येथे राहणारे ननावरे यांनी माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहायक म्हणून काम केले. तसेच माजी आमदार कलानी व शिवसेना शिंदे गटाचे आमदार किणीकर यांची मंत्रालयातील कामे करीत होते. १ ऑगस्टला दुपारी पत्नीसह राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरून ननावरे यांनी उडी मारून आत्महत्या केली. ननावरे यांच्या घरातून व्हिडिओ व्हायरल करण्याकरिता वापरलेला पेन ड्राइव्ह व एक चिठ्ठी पोलिसांना मिळाली होती. चिठ्ठीत नावे असलेल्यांना पोलिसांनी अटक केली. मात्र, व्हिडिओत ननावरे यांनी ज्यांची नावे घेतली त्या बड्या हस्तींवर पोलिसांनी अजून कारवाई केलेली नाही.
निंबाळकर यांना अटकपूर्व जामीन
ननावरे आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर, देशमुख बंधू व संग्राम निकाळजे यांनी २८ ऑगस्टपर्यंत न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पीएला पोलिसांनी मागील दारातून आणले
किणीकर यांचे स्वीय सहायक शशिकांत साठे याला उल्हासनगरच्या न्यायालयात हजर करताना पोलिसांनी साठे आणि अन्य आरोपींना न्यायालयाच्या मागील प्रवेशद्वारातून आणून मीडियाला गुंगारा दिला. ननावरे दाम्पत्याच्या सुसाइड नोटमध्ये संबंधित आरोपींची चौकशी करा, असा उल्लेख असल्यामुळे त्यांना अटक करणे चुकीचे असल्याचा युक्तिवाद वकिलांनी केला.. मात्र, न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
‘शशिकांत साठे हे माझे स्वीय सहायक आहेत ही बाब जगजाहीर आहे. विधिमंडळातील माझे कामकाज तेच पाहत असतात. मात्र साठे आणि ननावरे यांचे व्यक्तिगत संबंध काय होते आणि कसे होते याबाबत आपल्याला कल्पना नाही. सुसाइड नोटमध्ये जी नावे आली, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी ननावरे यांनी केली होती. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात योग्य ती चौकशी करावी. - डॉ. बालाजी किणीकर, शिवसेना आमदार, अंबरनाथ