शिपिंग एजंटचे अपहरण, गोराईहून सुटका; पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादाचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2022 08:08 AM2022-01-06T08:08:33+5:302022-01-06T08:08:51+5:30

शुभाशिष बॅनर्जी (६५) हे शिपिंग एजंट असून, त्यांना मनजीत यादव (२५) या शिपिंग एजंटने तीन तरुणांना शिपिंगमध्ये कामाला लावण्यासाठी तीन लाख दिले होते.

Shipping agent kidnapped, freed from Gorai: Consequences of money laundering controversy | शिपिंग एजंटचे अपहरण, गोराईहून सुटका; पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादाचा परिणाम

शिपिंग एजंटचे अपहरण, गोराईहून सुटका; पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादाचा परिणाम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून एका शिपिंग एजंटने दोघांच्या साहाय्याने एका शिपिंग एजंटचे अपहरण केल्याची घटना १ जानेवारीला घडली होती. दरम्यान, या गुन्ह्यातील आरोपींना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अपहृत शिपिंग एजंटची नालासोपारा येथील गोराई नाक्याजवळील एका हॉटेलमधून सुखरूप सुटका करण्यात आली.

शुभाशिष बॅनर्जी (६५) हे शिपिंग एजंट असून, त्यांना मनजीत यादव (२५) या शिपिंग एजंटने तीन तरुणांना शिपिंगमध्ये कामाला लावण्यासाठी तीन लाख दिले होते. बॅनर्जी यांनी तरुणांसाठी काम शोधले. त्यांचा व्हिसा तयार केला. त्यात मनजितने दिलेले पैसे खर्च झाले. त्या तिघांची श्रीलंकेस जाण्यासाठी तारीखही निश्चित झाली. मात्र, त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने तिघांना क्वारंटाइन करण्यात आले. १५ दिवस क्वारंटाइन असल्याने व्हिसाची मुदत संपली. यावर मनजितने शुभाशिष यांच्याकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. बॅनर्जी यांनी सर्व पैसे खर्च झाले, असे त्याला सांगितले. परंतु, मनजीतने पैशांचा तगादा सुरूच ठेवला. पैसे मिळत नसल्याने मनजितने धनंजय यादव आणि  सोमप्रकाश यादव यांच्या मदतीने बॅनर्जी यांचे अपहरण केले. अपहरणाची माहिती कळताच बॅनर्जी यांच्या पत्नीने मानपाडा पोलिसांत तक्रार दिली. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक  सुनील तारमळे यांच्या पथकाने तपास सुरू  केला.  मनजित हा बॅनर्जी यांच्या पत्नीला वारंवार फोन करून पाच लाखांची मागणी करीत होता. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देत होता. इतकेच नाही तर खात्यात पैसे टाकण्यास सांगितले. पोलिसांकडे ज्या अकाउंटमध्ये पैसे जमा झाले त्याची माहिती होती. तसेच मोबाइल लोकेशनद्वारे तपास करत गोराई नाक्याजवळील एका हॉटेलमधून बॅनर्जींची सुटका केली. मनजीतसह दोघांना अटक केली. 

पैशांसाठी किडनी 
विकण्याचा होता डाव

अपहरणकर्त्यांनी पैसे मिळविण्यासाठी भोपाळ येथे नेऊन बॅनर्जी यांची किडनी विकण्याचा डाव आखला होता. मात्र, आरोपींना तेथे जाण्यासाठी गाडी मिळाली नाही. त्यातच पोलिसांनी तत्परतेने त्यांची सुखरूप सुटका केल्याने अपहरणकर्त्यांचा डाव यशस्वी झाला नाही.
 

Web Title: Shipping agent kidnapped, freed from Gorai: Consequences of money laundering controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.