मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याचे शिवसैनिकांनी केले मुंडन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 10:26 PM2019-12-23T22:26:55+5:302019-12-23T22:28:45+5:30
उद्धव ठाकरेंविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला शिवसैनिकांनी चोप दिला.
मुंबई - वडाळा परिसरात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याचे शिवसैनिकांनी मुंडन केले. हा संतापजनक प्रकार वडाळा टी. टी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
उद्धव ठाकरेंविरोधातफेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला शिवसैनिकांनी चोप दिला. तसेच भरचौकात त्याचे केस कापून मुंडन करण्यात आलं. दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर 15 डिसेंबर रोजी जामिया मिलिया इस्लामियातील विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. या घटनेचा निषेध देशभरातील विविध ठिकाणांहून करण्यात येत आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाविरोधात वडाळात राहणाऱ्या हिरामणी तिवारी (३३) या व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट टाकली होती. मात्र, त्याला विरोध करताना शिवसैनिकांनी कायदाच हातात घेत तिवारी यांचे मुंडन केले.
ही घटना काल दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. मुख्यमंत्र्यांची बदनामीकारक पोस्ट फेसबुकवर टाकली म्हणून पोस्ट टाकणाऱ्या हिरामणी तिवारी यांच्या घरी शिवसेना शाखाप्रमुख समाधान जुगदर यांनी दोन इसमांनी पाठवून हाताने मारहाण केली आणि शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच मशीनने त्याचे केस कापून मुंडन केले. त्यावेळी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोचले आणि दोन इसमांनी पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांचे जबाब नोंद केले असता, त्यांनी त्यांच्यात समजाेता झाल्याचे सांगून एकमेकांविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगितले. मात्र, मुख्यमंत्र्यांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तिवारी यांचा जबाब नोंद करून समाधान जुगदर आणि त्यांच्या साथीदारांच्या विरोधात भा. दं. वि. कलम ३२३, ५००, ५०४, ५०६, ३४ अन्वये वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात कारवाई करण्यात आली.