एकनाथ शिंदे गटातही दोन गट; उल्हासनगरात रस्ते कामाच्या पाहणीवेळी तुफान हाणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 10:00 AM2022-12-13T10:00:42+5:302022-12-13T10:01:09+5:30

उल्हासनगर महापालिकेने रिंग रोड म्हणून विकसित केलेला मोर्यानगरीचा रस्ता कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महापालिकादरम्यान येतो. त्यामुळे अनेक वर्षे रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम रखडले होते.

Shiv Sena's Eknath Shinde group clashes in Ulhasnagar; The two groups clashed during the inspection of road works | एकनाथ शिंदे गटातही दोन गट; उल्हासनगरात रस्ते कामाच्या पाहणीवेळी तुफान हाणामारी

एकनाथ शिंदे गटातही दोन गट; उल्हासनगरात रस्ते कामाच्या पाहणीवेळी तुफान हाणामारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : कॅम्प नं. ४ येथील व्हीनस चौक ते श्रीराम चौक रस्ता पुनर्बांधणीपूर्वी नाल्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी विजय जोशी व माजी नगरसेवक विमल जोशी यांचे पती वसंत भोईर यांच्या समर्थकांत सोमवारी दुपारी हाणामारी झाली. या प्रकाराने मोर्यानगरी रस्ता वादात सापडून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात दाेन्ही बाजूंच्या तक्रारींवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू हाेती.

उल्हासनगर महापालिकेने रिंग रोड म्हणून विकसित केलेला मोर्यानगरीचा रस्ता कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महापालिकादरम्यान येतो. त्यामुळे अनेक वर्षे रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम रखडले होते. खासदार श्रीकांत शिंदे व स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे एमएमआरडीएअंतर्गत १७ कोटींच्या निधीतून रस्ता पुनर्बांधणीला मंजुरी मिळून काम सुरू झाले. सोमवारी दुपारी एक वाजता कॅम्प नं. ४ येथील एसएसटी महाविद्यालयासमोरील नाल्याच्या रुंदीकरणाची पाहणी करण्यासाठी आशेळे गावचे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी विजय जोशी समर्थकांसह आले होते. तेव्हा शिंदे गटाच्या माजी नगरसेविका विमल भोईर यांचे पती वसंत भोईरही तेथे समर्थकांसह आले. 

त्यावेळी दाेन्ही गटांत ‘तू तू-मैं मैं’ होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात तीनहून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
या हाणामारीने शिंदे गटातील वाद उफाळून आल्याचे दिसत असून पक्षाकडून दोन्ही गटांना समज देण्यात येणार असल्याचे पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितले.

पाेलिसांनी घेतली धाव
विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. सहायक आयुक्त मोतीचंद राठोड यांनीही घटनेचा आढावा घेतला. परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती त्यावेळी राठोड यांनी दिली.

Web Title: Shiv Sena's Eknath Shinde group clashes in Ulhasnagar; The two groups clashed during the inspection of road works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.