Shivling Theft: शिवमंदिरातून चोरांनी शिवलिंग चोरलं, ऐन श्रावण महिन्यात भाविक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 10:21 PM2022-07-26T22:21:16+5:302022-07-26T22:23:00+5:30
पोलिसांनी या चोरीमागे एक वेगळंच कारण सांगितलंय
Shivling Theft: श्रावणाच्या पवित्र महिन्यात भगवान शंकराची आराधना केली जाते. तसेच, शिवलिंगाची पूजा केली जाते. महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू होण्यास काही दिवस असले तरी उत्तरेकडील राज्यांत श्रावण महिना सुरू झाला आहे. अशा पवित्र महिन्या दरम्यान उत्तर प्रदेशातील ललितपूर मध्ये एक विचित्र घटना घडल्याचे दिसले. ललितपूर येथील शिवमंदिरातील शिवलिंग चोरट्यांनी पळवून नेले. ही घटना सोमवारी रात्री ललितपूरच्या जाखलौन शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवमंदिरातील शिवलिंग अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले. मंदिरात शिवलिंगाची तोडफोड करून आणि शिवलिंग उपटल्याच्या खुणाही सापडल्या आहेत. या प्रकरणी तक्रार नोंदवून पोलिसांनी चोरट्याला अटक करण्यास सुरुवात केली आहे.
जमिनीखाली दडलेल्या धनाच्या लोभापायी चोरी?
ललितपूर नगरचे पोलिस उपअधीक्षक (सीओ सिटी) फूलचंद यांनी मंगळवारी सांगितले की, सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी जाखलौन शहरातील शिव मंदिरातून शिवलिंग चोरले. त्यांनी सांगितले की, शिवमंदिर परिसरात जमिनीचे उत्खनन केल्याच्या खुणाही सापडल्या असून, त्यावरून असे दिसते की, जमिनीखाली दडलेल्या धनाच्या लोभापोटी ही चोरी केली असावी. अज्ञात चोरट्यांविरुद्ध संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू असल्याचे सीओ यांनी सांगितले.
गावातील लोकांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी भाविक पूजा करण्यासाठी मंदिरात पोहोचले तेव्हा त्यांना मंदिरात शिवलिंग दिसले नाही. मंदिरातील शिवलिंग चोरीला गेल्याची माहिती त्यांनी तात्काळ पोलिसांना दिली. उत्तरेकडील राज्यांमध्ये श्रावण महिना सुरू झाला असल्याने दररोज शेकडो भाविक मंदिरात जल अर्पण करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी येतात. अशा परिस्थितीत हे शिवलिंग लवकरात लवकर शोधावे आणि पुनर्स्थापित करावे अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
शिवलिंगाची चोरी झाल्यानंतर गावात अपशकून घडल्याची चर्चाही जोरात सुरू आहे. श्रावण महिन्यात मंदिरातून शिवलिंग चोरीला जाणे हे अशुभ आहे असं गावातील लोक चर्चा करत आहेत. भगवान शंकराबद्दल काही गोष्टी गावात बोलल्या जात आहेत. पण अपशकून किंवा अशा कोणत्याही गोष्टींवर भाष्य न करता पोलीस मात्र या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी सर्वस्व पणाला लावत आहेत.