भारताला धक्का! मुन्ना झिंगाडाला भारताकडे सोपविण्यास थायलँडचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 01:59 PM2019-10-02T13:59:42+5:302019-10-02T14:02:30+5:30
८ ऑगस्ट २०१८ ला बँकॉक कोर्टाने मुन्ना झिंगाडाचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले होते.
बँकॉक - छोटा शकीलचा हस्तक आणि कुख्यात गँगस्टर मुन्ना झिंगाडावरून भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. मुदस्सर हुसेन सय्यद ऊर्फ मुन्ना झिंगाडा हा पाकिस्तानचा नागरिक असून, त्याला आपल्याच ताब्यात देण्यात यावे, अशी मागणी पाकिस्तानने थायलंडमधील न्यायालयात केली आहे.८ ऑगस्ट २०१८ ला बँकॉक कोर्टाने मुन्ना झिंगाडाचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, छोटा राजनवरील हल्लाप्रकरण थायलँड कोर्टात दाऊदचा हस्तक मुन्ना झिंगाडाविरोधात सुरु असलेला खटला भारतीय तपास यंत्रणेच्या विरोधात गेल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.
झिंगाडा हा पाकिस्तानी नागरिक असल्याचा पाकिस्तानचा दावा फेटाळून लावत त्याला भारताकडे सोपविण्याचे आदेश थायलंडच्या गुन्हेगारी न्यायालयाने ऑगस्ट महिन्यात दिले होते. झिंगाडा याला थायलंडमध्ये छोटा राजनवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी थायलंड पोलिसांनी अटक केली होती. झिंगाडाला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी भारतीय तपास यंत्रणांनी केली होती. मात्र, पाकिस्तानने झिंगाडा हा पाकिस्तानी नागरिक असल्याचे सांगत त्याला पाकिस्तानच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. जानेवारी महिन्यात भारतीय पोलिसांचे एक पथक थायलंडला गेले होते. त्या पथकाने झिंगाडा हा भारतीय नागरिक असल्याचे पुरावे सादर केले होते. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान थायलँडच्या गुन्हेगारी न्यायालयाने मुन्ना झिंगाडाला भारताकडे सोपविण्यास नकार दिला आहे.
भारतीय तपास यंत्रणेला धक्का
गेल्या २ वर्षांपासून बँकॉक कोर्टात दाऊदचा हस्तक मुन्ना झिंगाडाच्या प्रत्यार्पणासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ओढाताण सुरु आहे. या खटल्यात भारतीय तपास यंत्रणांची मुन्नाला भारतात प्रत्यार्पण केले जावे अशी इच्छा असून देखील कुख्यात गुंड दाऊदने पाण्यासारखा पैसा खर्च करून पाकिस्तानच्या बाजूने हा खटला चालला. २००० साली कुख्यात गुंड छोटा राजनवर झिंगाडाने गोळ्या झाडल्या होत्या. मात्र, छतावरून उडी मारून आपला जीव वाचविण्यात राजनला यशस्वी झाला. परंतु राजनचा साथीदार रोहित वर्मा या हल्ल्यात मारला गेला. या हल्ल्यानंतर मुन्ना झिंगाडाला बँकॉक येथे अटक करण्यात आली आणि त्याच्याजवळील पाकिस्तानी पासपोर्ट जप्त करण्यात आला. तेव्हापासून मुन्ना झिंगाडा बँकॉकच्या तुरुंगात बंद आहे. २ वर्षांपूर्वी भारतीय तपास यंत्रणेने बँकॉक कोर्टात सबळ पुराव्यांसह प्रत्यार्पणासाठी धाव घेतली होती. त्यानंतर दाऊद कंपनीने आयएसआयद्वारे ज्येष्ठ वकील बँकॉक कोर्टात दाखल केले. ८ ऑगस्ट २०१८ साली भारताने खटला जिंकला होता आणि मुन्नाचा ताबा मिळविला होता. मात्र, बँकॉकमध्ये प्रत्येक कैद्याला कोर्टाच्या निर्णयाविरोधात अपिलात जाण्याची मुभा असल्याने त्याचा फायदा मुन्नाने घेतला. त्यानंतर १९ सप्टेंबर २०१९ ला कोर्टाचा निर्णय भारतीय तपास यंत्रणांच्याविरोधात देण्यात आला.