धक्क्याने आई-वडील चक्कर येऊन कोसळले; सातवीच्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 05:31 PM2021-02-17T17:31:41+5:302021-02-17T17:51:33+5:30
Suicide Case in Jalgaon : थोडा वेळ थांबल्यानंतर घराची चावी घेऊन आजी, आजोबांना सांगून भूषण हा घरी गेला. दुपारी एक वाजता आजी घरी गेली असता आतून दरवाजा बंद होता.
जळगाव : सातवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या भूषण कैलास भोई (वय १३) या मुलाने राहत्या घरातच दोरीन गळफास लावून जीवन संपविल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजता ब्रुकबॉड कॉलनीत घडली. त्याने आत्महत्या का केली याचे कारणही स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा धक्का बसल्याने आई, वडील चक्कर येऊन कोसळले.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास रतन भोई हे पत्नी रत्ना, मुलगा भूषण (१३), विशाल (१०), सासरे भिमराव मांगो भोई व सासू लक्ष्मीबाई अशांसह ब्रुक बॉड कॉलनीत भाड्याच्या घरात वास्तव्याला असून महामार्गावर अग्रवाल चौकात चहा, नाश्त्याची हातगाडी लावतात, त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो तर सासऱ्यांनीही पलीकडे चार दिवसापूर्वीच रसवंती सुरु केली होती. सासऱ्यांना मुलगा नाही, रत्ना ही एकच मुलगी असल्याने ते देखील यांच्यातच वास्तव्याला होते. भूषण हा आजी, आजेाबा यांच्यासोबत दुपारी बँकेत गेला होता. तेथून आल्यावर ते चहाच्या हातगाडीवर गेले तेथे त्याची आई रत्ना होती तर वडील नशिराबाद येथे गेले होते. थोडा वेळ थांबल्यानंतर घराची चावी घेऊन आजी, आजोबांना सांगून भूषण हा घरी गेला. दुपारी एक वाजता आजी घरी गेली असता आतून दरवाजा बंद होता.
आवाज देऊनही आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आजी पुन्हा चहाच्या दुकानावर आली, तेथे भूषण हा दरवाजा उघडत नाही व आवाज पण देत नाही असे सांगितले. त्याच्या वडीलांनाही ही माहिती देण्यात आली. ते तातडीने घरी दाखल झाले. चहाच्या दुकानाजवळून लोखंडी टॉमी घेऊन दरवाजा तोडला असता भूषण याने गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून वडली कैलास व आई रत्ना यांना मानसिक धक्का बसला, त्यातच चक्कर येऊन ते कोसळले. दरम्यान, आजुबाजुच्या लोकांनी भूषण याला शासकीय वैद्यकिय रुग्णालय व महाविद्यालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास शेंडे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली तर रुग्णालयात अंमलदार तुषार जवरे यांनी पंचनामा केला.