धक्कादायक! रक्तदंतिका माता मंदिरात 13 लाखांची लूट; सोन्या-चांदीच्या वस्तुंवर मारला डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2023 11:47 AM2023-09-20T11:47:09+5:302023-09-20T11:48:09+5:30
दरोडेखोरांनी मंदिरात झोपलेले दोन पुजारी व एका सहाय्यकाला बंधक बनवून बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले.
राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील हिंदोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सथूर येथील रक्तदंतिका माता मंदिरात धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी मंदिरात झोपलेले दोन पुजारी व एका सहाय्यकाला बंधक बनवून बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने, मंगळसूत्र व इतर मौल्यवान वस्तू लुटून दरोडेखोरांनी पळ काढला. या घटनेत एक पुजारी गंभीर जखमी झाला असून त्याला कोटा येथे रेफर करण्यात आले आहे.
दोन जणांना बुंदी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काल रात्री एक ते दीड वाजण्याच्या दरम्यान बुंदी येथील सथूर गावात असलेल्या रक्तदंतिका माता मंदिरात दरोडेखोर लुटण्याच्या उद्देशाने आले. दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश केला आणि झोपलेल्या पुजारी आणि सहायकावर हल्ला केला.
सथूर माता मंदिराचे पुजारी अजय ब्रह्म भाट यांनी सांगितलं की, रात्री 12 वाजल्यानंतर मंदिरात सेवक राम अवतार उर्फ पप्पू, नवरत्न, राजू प्रजापत रा. सथूर हे झोपले होते. दरम्यान, 6 ते 7 दरोडेखोर मंदिरात घुसले. त्यांनी पुजाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. राजू प्रजापत यांच्या डोक्याला व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. यानंतर, पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.
रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना बुंदीला पाठवण्यात आले, तेथून एकाला कोटा येथे रेफर करण्यात आले. दोघांना बुंदीमध्ये दाखल करण्यात आले आहे. पुजारी अजय ब्रह्मा भाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी मंदिरातून 7 तोळे सोने आणि 12 किलो चांदी चोरून नेली. ज्यामध्ये चांदीचे छत्र, सोन्याची नथ, मंगळसूत्र, मुकुट इ. चोरीला गेलेल्या मालाची किंमत सुमारे 13 लाख रुपये आहेत.
मंदिरात चोरीच्या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हे मंदिर देवस्थान विभागाच्या अंतर्गत येतं. मंदिरात चोख सुरक्षा व्यवस्था नव्हती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांअभावी दरोडेखोरांबाबत फारशी माहिती मिळू शकली नाही. घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.