धक्कादायक! पुण्यातील तात्पुरत्या कारागृहातून २ कैदी फरार; जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 11:52 AM2020-06-13T11:52:50+5:302020-06-13T12:11:22+5:30
बाथरूमचे गज वाकवून केले पलायन
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या येरवडा कारागृहातून दोन कैदी शनिवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पळून गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
हर्षद हानिफ सय्यद (वय २०, रा. कासारवाडी) आणि आकाश बाबुलाल पवार (वय २४, रा. काळेवाडी, पिंपरी) अशी पळून गेलेल्या दोघांची नावे आहेत. बाथरुमच्या खिडकीचे गज वाकवून ते पळून गेल्याचे उघड झाले आहे. दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल आहेत.
येरवडा कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून नवीन कैद्यांसाठी प्रशासनाने शहरात दोन ठिकाणी तात्पुरती कारागृहे उभारली आहेत.
आकाश पवार याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे़ तर, हर्षद सय्यद याच्यावर खडकी पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल आहे. या दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी मंजूर केली होती. त्यामुळे त्यांना येरवडा येथील तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यांनी बाथरुमच्या खिडकीचे गज वाकवून तेथून पलायन केले.
गेल्या आठवड्यात बार्टी येथील तात्पुरत्या कारागृहातून बाळासाहेब कांबळे या कैद्यांने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता़ पोलिसांनी त्याला पकडले होते.