धक्कादायक! नागपुरात हत्येच्या घटनांमध्ये ३७ टक्क्यांनी वाढ

By योगेश पांडे | Published: July 16, 2024 11:43 PM2024-07-16T23:43:01+5:302024-07-16T23:43:34+5:30

सहा महिन्यांच्या आकडेवारीतील वास्तव : प्राणघातक हल्लेदेखील वाढले, गुन्हेगारी व गुन्हेगारांवर नियंत्रण नाहीच

Shocking! 37 percent increase in murder incidents in Nagpur | धक्कादायक! नागपुरात हत्येच्या घटनांमध्ये ३७ टक्क्यांनी वाढ

धक्कादायक! नागपुरात हत्येच्या घटनांमध्ये ३७ टक्क्यांनी वाढ

(गुन्हेगारीचे रिपोर्टकार्ड - भाग १)

नागपूर : उपराजधानीतील गुन्ह्यांचा मुद्दा राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चिल्या जातो व त्यावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये सभागृहांत दावे-प्रतिदावेदेखील होतात. मात्र, यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत हत्येच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे वास्तव समोर आले आहे. मागील वर्षीच्या सहा महिन्यांच्या आकडेवारीशी तुलना केली तर यंदा जानेवारी ते जून या कालावधीत हत्येच्या घटनांमध्ये तब्बल ३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर सहा महिन्यांत हत्येच्या प्रयत्नांच्या प्रकरणांत झालेली वाढदेखील चिंताजनक आहे. अशा स्थितीत नागपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मागील वर्षभरात नागपुरात ७९ हत्या नोंदविल्या गेल्या होत्या. दर दोन महिन्यांत सरासरी १३ हत्या झाल्या होत्या, तर जानेवारी ते जून या कालावधीत ३५ हत्या झाल्या होत्या. यावर्षी या आकड्यात चांगलीच वाढ झाली आहे. जानेवारी ते जून २०२४ या काळात नागपुरात ४८ हत्यांची नोंद झाली. जर मागील वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांशी तुलना केली तर यंदा ३७.१४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फेब्रुवारी व जून महिन्यांत सर्वाधिक प्रत्येकी ११ हत्यांची नोंद झाली.

लहानसहान कारणांवरून हत्येचा प्रयत्न
या वर्षी लहानसहान कारणांवरून हत्येच्या प्रयत्नांच्या गुन्ह्यांचीदेखील नोंद झाली. जानेवारी ते जून या कालावधीत हत्येच्या प्रयत्नांचे १०४ गुन्हे नोंदविले गेले. याची दर महिन्याची सरासरी १७ इतकी आहे. २०२३ साली हत्येच्या प्रयत्नांचे १२१ गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यावर्षी जानेवारी ते जून या कालावधीत तर आकडा ६४ इतका होता. जर मागील वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांतील घटनांशी तुलना केली तर यंदा हत्येच्या प्रयत्नांच्या गुन्ह्यांमध्ये थोडीथोडकी नव्हे तर ६२.५० टक्के वाढ झाली आहे.

किती अटकेत? अब तक ‘१००’
हत्येच्या घटनांमध्ये सहा महिन्यांत १०० जणांना अटक करण्यात आली. त्यात चार महिला आरोपींचादेखील समावेश होता. मागील वर्षभरात १५२ हत्येच्या आरोपींना अटक झाली होती. जानेवारी ते जून या कालावधीत झालेल्या हत्येच्या प्रयत्नांच्या घटनांमध्ये पोलिसांना २१४ जणांना अटक करण्यात यश आले. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे.

सहा महिन्यांतील हत्या
महिना : २०२४ : २०२३
जानेवारी : ५ : १०
फेब्रुवारी : ११ : ३
मार्च : ४ : ७
एप्रिल : ८ : ७
मे : ७ : २
जून : ११ : ६

सहा महिन्यांतील हत्येच्या प्रयत्नांचे गुन्हे
महिना : २०२४ : २०२३
जानेवारी : ११ : १०
फेब्रुवारी : ९ : ७
मार्च : १७ : १८
एप्रिल : १४ : ११
मे : ३२ : ११
जून : २१ : ७

Web Title: Shocking! 37 percent increase in murder incidents in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.