धक्कादायक! रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ७० लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 10:05 PM2019-05-24T22:05:31+5:302019-05-24T22:06:17+5:30
१९ जणांची फसवणूक केल्याचा संशय; महिलेससह तिघांना अटक
मुंबई - रेल्वेतनोकरीला लावण्याचे आमिष दाखवून चार जणांच्या टोळीने मुंबईसह राज्यातील १८ तरुण-तरुणींकडून सुमारे ७० लाख रुपयांचा गंडा घातल्याची घडना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सीमा पवार(३०), राजेश कुमार (२८) व संजीव राय (३९) यांना गुन्हे शाखेच्या कक्ष ११ च्या पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी या तिघांसह मनिष सिंग नावाच्या आरोपाचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस याप्रकणी अधिक तपास करत आहेत.
देशभरात सध्या रेल्वे भरतीसाठी अनेकांनी अर्ज केले असताना भुरट्यांनी मात्र संधीचा फायदा घेऊन कायमस्वरुपी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचा गोरख धंदाच सुरू केला. ऐरोली परिसरात राहणारे तक्रारदार सखाराम लांडगे हे कायमस्वरूपी नोकरीच्या शोधात होते. त्यांनी रेल्वे भरतीसाठी फॉर्म भरला होता. त्याचवेळी त्यांची ओळख राजेशकुमार, मनिष सिंग, संजीव राय आणि सीमा पवार यांच्याशी झाली. त्यावेळी चौघांनी रेल्वेत ओळखीवर पैसे भरून तिकिट कलेक्टरपदी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार लांडगे यांनी त्याच्यासह त्यांच्या १८ मित्रांचे मिळून ७० लाख रुपये आरटीजीएसटीद्वारे या चौघांकडे जमा केले.
या चौकडीने पैसे घेतल्यानंतर १८ जणांना काही दिवसातच रेल्वेचे अपॉंमेंट लेटर, पोस्टिंग लेटर, पेमेंट स्लिप, आणि ओळखपत्र ही पोस्टाने पाठवले. ऐवढेच नव्हे तर त्या १८ जणांना विश्वास पटावा, त्यासाठी आरोपींनी इंटरनेटवर रेल्वेची बनावट साईडही बनवून त्यावर या १८ जणांचे सिलेक्शन झाल्याची यादी जाहीर केली. मात्र यातील एका तरुणाने रेल्वेच्या सीएसटी येथील कार्यालयात काही त्रुटीबाबत संपर्क साधला असता. रेल्वेन अशा प्रकारे कुठलीही नियुक्तीची यादी जाहीर केली नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर चौकशीत या चौंघांनी फसवणूक केल्याचे कळाल्यानंतर सखाराम लांडगे यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तपासात या चौघांनी नुसते मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे, तर उत्तरप्रदेश कोलकत्ता येथील ही अनेक मुलांना अशा प्रकारे फसवल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार चौघांवर भा.दं.वि कलम 419, 406, 420, 465,467, 468, 471, 472, 473, 475,120(ब) सह कलम 66(क), 66(ड) माहिती व तंत्रज्ञान कायदा सन अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्यात प्रभारी पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा ११ चे पोलीस अधिक तपास करत आहेत.