धक्कादायक...गतीमंद युवतीवर ७० वर्षीय वृद्धाचा अत्याचार, गर्भपात करून अर्भक जाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 08:07 PM2021-06-19T20:07:34+5:302021-06-19T20:21:50+5:30
70 year old raped a mentally retarded girl : देविदास बोंबटकारने १९ वर्षीय युवतीवर सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत शारीरिक अत्याचार केला.
जळगाव जामोद : तालुक्यातील आदिवासी ग्राम इस्लामपूर शिवारात निवासाला असलेल्या गतीमंद युवतीवर सात महिन्यापासून अत्याचार केल्याने युवतीला गर्भधारणा झाली. त्यानंतर खाजगीरीत्या गर्भपात करून पाच ते सहा महिन्याच्या अर्भकाला जाळल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
वडोदा तालुका मुक्ताईनगर येथील देविदास ओंकार बोंबटकार (वय ७० ) याचे तालुक्यातील इस्लामपूर शिवारात शेत आहे. या शेताच्या बाजूला असलेल्या कुटुंबातील गतीमंद युवतीवर आरोपी देविदास बोंबटकारने १९ वर्षीय युवतीवर सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत शारीरिक अत्याचार केला .त्यामुळे पीडितेला गर्भधारणा झाली .त्यानंतर तिला खाजगीरित्या औषधी देऊन बळजबरीने तिचा गर्भपात करण्यात आला. नवजात अर्भकाला आरोपी देविदास बोंबटकार व सुभाष मानसिंग सस्त्या (वय ५०) राहणार इस्लामपूर या दोघांनी जाळून टाकले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन काकडे यांनी १८ जून रोजी रात्री उशिरा जळगाव जामोद पोलिसात तक्रार दिली. त्यावरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये कलम ३७६ (२) (एल)(एन) ३१५ व ३१८ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश आडे करीत आहेत.