थरकाप उडवणारी घटना! 7 वर्षांच्या मुलानं मित्राला डिझेल ओतून जिवंत जाळलं; कारण जाणून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 08:33 PM2022-06-16T20:33:24+5:302022-06-16T20:34:07+5:30
आरोपी मुलाविरुद्ध कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेळत असताना झालेल्या वादातून एका ७ वर्षांच्या मुलाने आपल्या 14 वर्षांच्या मित्राला डिझेल ओतून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. जवळपास एक महिना जगण्यासाठी मृत्यूशी झुंजत असताना, उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना राजस्थानातील कोटा येथील उद्योग नगर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध कलम 302 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
उद्योग नगर पोलीस ठाण्याचे प्रमुख मनोज सिकरवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव विशाल असे आहे. तो आपल्या वडिलांसोबत (छोटेलाल) भाजी-पाल्याच्या दुकानावर बसत होता. विशालने फार पूर्वीच शिक्षण सोडले होते. 12 मे रोजी त्याने वडिलांसोबत भाजीपाला खरेदी करून दुकानात आणला. यानंतर त्याचे वडील दुकानावरच थांबले आणि तो घरी गेला. यानंतर काही वेळाने विशाल शेजारी राहणाऱ्या आपल्या 7 वर्षाच्या मुलासोबत खेळू लागला. याचदरम्यान दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले.
वडिलांच्या रिक्षातून आणले डिझेल अन्... -
पोलिसांचे म्हणणे आहे, की या दोघांमध्ये झालेले भांडण त्यांच्या कुटुंबीयांनी फारसे गांभीर्याने घेतले नाही. त्यांचे भांडण आणखीनच वाढत गेले. यानंतर आरोपी मुलाने त्याच्या वडिलांच्या रक्षातून डिझेलने भरलेली बाटली आणली आणि ते विशालवर शिंपडून लगेचच आग लावली. या घटनेत विशाल 50 टक्के भाजला होता. यानंतर, त्याला एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
आजी-आजोबांकडे राहत होता 7 वर्षांचा मुलगा -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा आधी मध्य प्रदेशातील श्योपूर या गावात आजी-आजोबांसोबत राहत होता. त्याचे वडील कोटा येथे रिक्षा चालवतात. महिनाभरापूर्वी त्याच्या वडिलांनी त्याला शाळेत प्रवेश घेण्यासाठी कोटा येथे आणले होते. येथे आल्यानंतर त्याची शेजारी राहणाऱ्या विशालसोबत मैत्री झाली होती.
जेजे अॅक्टमध्ये होणार कारवाई -
आरोपी मुलाविरुद्ध कलम 302 नुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या वडिलांसोबत श्योपूर येथे आहे. पोलीस नियमाप्रमाणे त्याची चौकशी करू शकतात. जुवेनाइल जस्टिस अॅक्टच्या तरतुदीनुसारच मुलावर कारवाई केली जाईल.