धक्कादायक! एकाच घरातील तिघांची हत्या, रक्ताच्या थारोळ्यात पडले होते मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 09:48 PM2020-04-13T21:48:47+5:302020-04-13T21:52:12+5:30
खून झालेल्या तिघांमध्ये पती, पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे.
लॉकडाऊनदरम्यान देशभरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असूनही शनिवार-रविवारीदरम्यानच्या मध्यरात्री छत्तीसगडमधील बलौदाबाजार शहरात खळबळजनक गुन्हा घडला आहे. एकाच कुटुंबातील तीन जणांची येथे हत्या झाली. खून झालेल्या तिघांमध्ये पती, पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे. मात्र या घटनेमागील कारण पुढे आले नाही किंवा आरोपींचीही ओळख पटली नाही.
ही खळबळजनक घटना बलौदाबाजारमधील पलारी पोलिस स्टेशन परिसरातील चेरकडीह गावची आहे. गावात साहू कुटुंबातील तीन जणांची घरातच हत्या करण्यात आली. तिघांना धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे. घरातही मोठ्या प्रमाणात रक्त पसरले होते.
मृतांमध्ये घराचा प्रमुख यशवंत साहू (४७ वर्षे), त्याची पत्नी माहेश्वरी साहू (४५ वर्षे) आणि मुलगा देवेंद्र (१७ वर्षे) यांचा समावेश आहे. घटनेच्या रात्री उर्वरित सदस्यही घरी उपस्थित होते, जे दुसऱ्या खोलीत झोपले होते, त्यांचे प्राण वाचले.
एक धक्कादायक बाब समोर आली आहे की, एकाच घरात इतकी मोठी घटना घडून देखील घरातील बाकीच्या सदस्यांनाही याबद्दल माहिती नव्हती. त्याचवेळी, जेव्हा घरातील इतर सदस्य त्यांच्या खोल्यांमधून खाली आले, तेव्हा तिघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. या घटनेत वाचलेल्यांनी पलारी पोलिस स्टेशनच्या पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिक आणि श्वानपथकाच्या मदतीने पुराव्यांचा शोध सुरू केला.
बलौदाबाजारचे एसडीओपी सिद्धार्थ बघेल यांनी माहिती देताना सांगितले की, घटनेची माहिती मिळताच एसपी प्रशांत ठाकूर यांच्यासह पोलिसांची संपूर्ण पथक घटनास्थळी पोचले आणि या प्रकरणाच्या चौकशीत सामील झाले. एकाच कुटुंबातील तीन जणांना ठार मारल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या खुनांकडे लूट, जुना वाद आणि प्रेम प्रकरण यादृष्टीने तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.