धक्कादायक! शाळेच्या स्वच्छतागृहात विद्यार्थ्यावर वार : आठवीतील मुलांचे कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 02:15 PM2019-09-25T14:15:30+5:302019-09-25T14:30:56+5:30
शाळेच्या विद्यार्थ्यांच्या टोळी युध्दातून घडली घटना..
पुणे: सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी परिसरातील एका नामांकित शाळेमधील इयत्ता आठवीच्याविद्यार्थ्याने सातवीच्या विद्यार्थ्याच्या हातावर धारदार कटरने वार केले.त्यामुळे त्याच्या हाताला 11 टाके पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.शाळेच्या विद्यार्थ्यांच्या टोळी युध्दातून घडली घटना.
दिल्लीतील रॉयल इंटरनॅशनल स्कूल या शाळेत इयत्ता दुसरीतील मुलाचा बस चालकाने निर्घृण खून केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. त्यामुळे खासगी व नामांकित शाळांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. ज्ञानदानाचे काम करणारे शैक्षणिक संकुलही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित नाही का? शाळा प्रशासनाच्या भरवशावर मुलांना शाळेत पाठवणे उचित आहे का? अशा अनेक बाजूंनी चर्चा झाली होती. आता पुण्यातही एका आठवीच्या मुलाने सातवीच्या मुलाच्या हातावर स्वच्छतागृहात धारदार कटरने वार केल्याची घटना नुकतीच घडली.त्यामुळे पुन्हा एकदा पालकांनो जागे व्हा! असे म्हणण्याची वेळ आली आहे.
शाळेमध्ये प्रवेश देताना मुलांची वागणूक तपासली जात नाही.एखादा मुलगा त्याच शहरातील काही किलो मीटर परिसरातील एखादी नामांकित शाळा सोडून आपल्या शाळेत प्रवेश का घेतो? याबाबत शाळा प्रशासन जराही गंभीर नाही. केवळ डोनेशन मिळते म्हणून कोणत्याही मुलाला शाळेत प्रवेश द्यायचा,असाच विचार शाळांकडून होताना दिसत आहे.पुण्यात सातवीतील मुलावर वार करणा-या आठवीतील या विद्यार्थ्याला पूर्वी एका शाळेने नाव कमी (रस्टिकेट)करून काढून टाकले होते.त्यानंतर त्याला सिंहगड रस्त्यावरील शाळेने प्रवेश दिला होता.त्याच मुलाने हे कृत्य केल्याचे पालकांकडून सांगितले जात आहे.
सातवीतील मुलगा सुरूवातीपासून सिंहगड रस्त्याच्या शाळेत शिक्षण घेत होता.तर नव्याने या शाळेत दाखल झालेल्या आठवीतील मुलाचा आणि त्याचा लहान-सहान कारणांवरून वाद होत होता.या दोन्ही विद्यार्थ्यांनी स्वत:ची टोळी तयार केली होती. त्यामुळे आठवीतील मुलाने आपल्या मित्राच्या मदतीने सातवीतील मुलाला स्वच्छतागृहात बोलवून त्याच्या हातावर वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे शाळेतील इतर मुलांच्या मनावर विपरित परिणाम झाला आहे.शाळा प्रशासनाने व संस्थाचालकाने हे प्रकरण बाहेर येऊ नये, याची काळजी घेतली आहे.परंतु,पालकांकडून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.