खळबळजनक! भरदिवसा फायनान्स कंपनीत दरोड्याचा प्रयत्न; हिंजवडीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 21:40 IST2021-02-01T21:39:46+5:302021-02-01T21:40:01+5:30
आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली

खळबळजनक! भरदिवसा फायनान्स कंपनीत दरोड्याचा प्रयत्न; हिंजवडीतील घटना
पिंपरी : सोने तारण ठेवून कर्ज देणाऱ्या कंपनीत पिस्तुलाच्या धाक दाखवून चौघांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मुत्तुट फिनकॉर्प गोल्डलोन कंपनीच्या हिंजवडी शाखेत सोमवारी (दि. १) दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
मुत्तुट फिनकॉर्प गोल्डलोन कंपनीच्या हिंजवडी शाखेच्या व्यवस्थापक संस्कृती रविभूषण शरण (वय २६, रा. जिंजर सोसायटी, पिंपळे सौदागर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार अनोळखी आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नेहमी प्रमाणे काम करीत असताना एक अनोळखी तरुण गोल्ड लोन पाहिजे, असा बहाणा करून चौकशी करण्यासाठी त्यांच्या शाखेत आला. कार्यालायची पाहणी करून सोने घेऊन येतो, असे सांगून निघून गेला. काही वेळाने त्याच्या तीन साथीदारांना तो घेऊन आला. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या स्टाफला पिस्तुलाचा धाक दाखवून सोने आणि रोकड काढून देण्याची मागणी केली. मात्र, त्यावेळी एका कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखून सायरन सुरू केला. सायरनचा आवाज ऐकून आरोपींनी पळ काढला.