धक्कादायक! भाजपाच्या पदाधिकाऱ्याने शस्त्रे घेतली होती क्रॉफर्ड मार्केटमधून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 03:54 PM2019-01-17T15:54:19+5:302019-01-17T15:55:53+5:30
मालेगाव स्फोटाचे डोंबिवली कनेक्शन असे बोलले गेले होते. आता डोंबिवलीतील शस्त्रांच्या दुकानाचे कनेक्शन कोणाशी व कुलकर्णीचा जहाल हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध काय, असा सवाल केला जात आहे.
डोंबिवली - डोंबिवलीत येथे कुलकर्णीकडे सापडलेली शस्त्रे नेमकी कोठून आणली गेली याबाबत अनेक तर्कविर्तक लावले जात होते़ मात्र ही शस्त्रे क्रॉफर्ड मार्केटमधून आणल्याची कबुली कुलकर्णी याने पोलिसांना दिली आहे.
कारवाईबाबत भाजपाचे मौन
भाजपाचे पदाधिकारी शशिकांत कांबळे यांच्याकडे याप्रकरणी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, कुलकर्णी हे भाजपाचे डोंबिवली शहर उपाध्यक्ष आहेत. मात्र, त्यांच्या या प्रकरणाविषयी अधिक माहिती नाही. त्याच्याविरोधात काय कारवाई करणार, या प्रश्नावरही मात्र भाजपाने मौन बाळगले आहे.
सोशल मीडियावर भाजपा लक्ष्य
मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी कुलकर्णीच्या कृत्याने डोंबिवलीची चाल, चित्र आणि चेहरा भाजपाने बिघडवला, अशी टीका केली. डोंबिवलीत भाजपाने अखिल भारतीय शस्त्र प्रदर्शन आयोजित केले होते का, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आनंदी आनंद गडे, शस्त्रेच शस्त्रे चोहीकडे, अशी काव्यात्मक टीका सोशल मीडियावर दिसून आली.
भाजपाला दंगल घडवायची होती का?
भाजपाच्या डोंबिवली शहर उपाध्यक्षाला शस्त्रसाठा बाळगल्याप्रकरणी अटक केल्याने या हत्यारांचा वापर करून भाजपाला दंगली घडवायच्या होत्या का, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी संतोष केणे यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व त्याने ही शस्त्रे कोणाकडून घेतली आणि कोणाला विकली, कुलकर्णी याचा सूत्रधार कोण, याचाही छडा लावला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. अर्बन नक्षलवादी हिणवणारेच निघाले सबर्बन नक्षली मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर टीका करताना काही दिवसांपूर्वी म्हटले होेते की, २०१९ सालच्या निवडणुकीपूर्वी भाजपाला दंगली घडवून सत्तेवर यायचे आहे. तोच धागा पकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. कल्याण पूर्वेत राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन संकल्पयात्रा पार पडली. यावेळी सभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भीमा कोरेगावची दंगल कोणी घडवली, असा प्रश्न केला होता.
काही वर्षांपूर्वी मालेगाव येथील बॉम्बस्फोटप्रकरणी डोंबिवलीच्या एका तरुणाला दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती. तेव्हा मालेगाव स्फोटाचे डोंबिवली कनेक्शन असे बोलले गेले होते. आता डोंबिवलीतील शस्त्रांच्या दुकानाचे कनेक्शन कोणाशी व कुलकर्णीचा जहाल हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध काय, असा सवाल केला जात आहे.