धक्कादायक! ओला कॅब चालकाचा मृतदेह सापडला खंडाळ्याच्या जंगलात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 08:34 PM2021-06-28T20:34:47+5:302021-06-28T20:35:42+5:30
Crime News : विरार पोलीस ठाण्यात १९ जूनपासून हरवल्याची तक्रार होती दाखल
नालासोपारा : सहकार नगरमध्ये राहणारे ४५ वर्षीय ओला कॅबचालक १९ जूनला बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत खंडाळा परिसरातील जंगलात रविवारी सापडला आहे. खंडाळा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. नेमकी ही हत्या आहे की अपघात याचा पोलीस तपास करत आहे.
१९ जूनला राहुलकुमार झा (२२) या मुलाने विरार पोलीस ठाण्यात वडील संतोष झा (४५) यांचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तक्रार दाखल करून शोध सुरू केला. त्याच दिवशी संध्याकाळी कोल्हापूरहून ओला कार जप्त करण्यात आली. पोलिसांना गाडीच्या मागील बाजूस रक्ताचे डाग सापडल्यानंतर दोन पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांच्या दोन पथकांनी खंडाळा क्षेत्र पुलासमोर घनदाट जंगलात संतोष झा यांचा शोध सुरू केला. त्याच परिसरातील एका पेट्रोल पंपावर त्यांच्या कार्डचा वापर करून ट्रांझेक्शन झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी मोबाइल माहितीद्वारे अपहरण करणाऱ्या कांदिवली येथील दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतल्याचेही कळते. पोलीस पथकाला खंडाळा परिसरातील घनदाट जंगलात एक कुजलेला मृतदेह सापडल्यामुळे संतोष झा यांना ओळखण्यात पोलिसांना अडचण निर्माण झाली होती.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठविला. मात्र मृतदेहाचे शरीर खूपच खराब झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलगा आणि वडिलांचे डीएनए जुळल्यानंतर हा मृतदेह त्यांचाच असल्याची पोलिसांची खात्री पटली. दीर्घकाळ मृतदेह ठेवल्याने कोविडसारख्या आजाराची शक्यता असल्याने तेथील समशानभूमीत मुलाने पोलिसांसमोर वडिलांच्या मृतदेहाला अग्नी दिली.
कांदिवली येथून अपहरण
पोलीस सूत्रांनुसार, मुंबईच्या कांदिवली येथील दोन सख्ख्या भावांनी १७ जूनला ओला कॅब कर्नाटक येथील गावाला जाण्यासाठी बुक केली होती. तेथूनच त्यांचे अपहरण करण्यात आले होते. कार तेथून पनवेल, खोपोली अशी फिरवण्यात आल्यानंतर खंडाळा येथे नेण्यात आले. आरोपींनी त्यांची हत्या करून मृतदेह घनदाट जंगलात टाकून पळून गेल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. दरम्यान, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला कांदिवली येथून ताब्यात घेतल्याचे कळते.
कोट
खंडाळ्याच्या जंगलामध्ये संतोष झा यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. कोणालाही ताब्यात घेतले नसून चौकशी सुरू आहे. त्यांच्या मृतदेहावर तेथील समशानभूमीत अंत्यसंस्कार केले आहेत. तेथील पोलीस ठाण्यातून कागदपत्रे आल्यावर पुढील कारवाई नक्कीच होणार. - सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे.