धक्कादायक ! भाच्याने मामाला जिवंत जाळले; तळेगाव दाभाडे येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 08:18 PM2020-10-20T20:18:15+5:302020-10-20T20:19:14+5:30
घरात झोपू न दिल्यास मारून टाकण्याची धमकी दारू पिऊन आलेल्या आरोपीने दिली होती.
तळेगाव दाभाडे : भाच्याने मामाच्या डोक्यात दगडाने व लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यास जिवंत जाळले. तळेगाव दाभाडे येथील जाधव चाळ येथे मंगळवारी (दि. २०) पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान खुनाचा ही घटना घडली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
विजयसिंग भगवानसिंग जव्हेरी (वय ५५), असे खून झालेल्या मामाचे नाव आहे. त्यांच्या पत्नी मीना विजयसिंग जव्हेरी (वय ४७, रा. जाधव चाळ, डाळआळी, तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिलीे. नारायणसिंग विजयसिंग जव्हेरी (वय २५), असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सुदर्शन व त्यांची पत्नी विशाखा तसेच त्यांचा एक वर्षांचा मुलगा हे मध्यप्रदेशात इंदूर येथे राहतात. फिर्यादी यांचे पती विजयसिंग जव्हेरी यांची वीस वर्षांपूर्वी ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया झाली होती. पाच ते सहा महिन्यांपासून ते अंथरुणाला खिळून होते. पती आजारी असल्याने फिर्यादी यांनी त्यांच्या ओळखीच्या लीलाबाई चव्हाण यांना मदतीसाठी बोलावले होते.
दरम्यान, फिर्यादी यांचा लहान भाऊ विजयसिंग गुलाबसिंग जव्हेरी हे कुटुंबासह तळेगाव दाभाडे येथे राहण्यासाठी आले होते. फिर्यादी यांच्या घराशेजारी एका खोलीत ते वास्तव्यास आहेत. फिर्यादी यांच्या या भावाचा मुलगा आरोपी नारायणसिंग हा दारू पिऊन त्याच्या कुटुंबियांना त्रास देत असे. मंगळवारी पहाटे तो फिर्यादी यांच्याकडे आला. घराच्या दरवाजावर लाकूड मारून दरवाजा उघडला. त्यावेळी त्याच्या हातात सिमेंटचा दगड होता.
घरात झोपू न दिल्यास मारून टाकण्याची आरोपी नारायणसिंग याने धमकी दिली. त्यामुळे लिलाबाई चव्हाण आणि फिर्यादी या घाबरून घरातून बाहेर पळाले. त्यानंतर नारायणसिंग याला घरात कोंडून ठेवले. बाहेरून दरवाजाची कडी लावली. त्यानंतर लिलाबाई चव्हाण आणि फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घरातून धूर येत होता. आरोपी याने फिर्यादी यांच्या पतीला जाळूल्याचे दिसून आले. यात फिर्यादी यांच्या पतीचा मृत्यू झाला.