धक्कादायक! प्रेमविवाहामुळे मुलाच्या आईची अर्धनग्न धिंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 06:03 AM2024-04-08T06:03:27+5:302024-04-08T06:04:17+5:30
तरनतारनचे एसपी अश्वनी कपूर यांनी सांगितले की, पीडित महिलेचा मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडला होता
बलवंत तक्षक
चंडीगड : प्रेमविवाह केल्यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या नातेवाइकांनी मुलाच्या आईची अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर धिंड काढल्याप्रकरणी तसेच कपडे फाडल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. महिलेचा विनयभंग आणि कपडे फाडल्याच्या या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे.
तरनतारनचे एसपी अश्वनी कपूर यांनी सांगितले की, पीडित महिलेचा मुलगा एका मुलीच्या प्रेमात पडला होता आणि त्यांनी कोर्टात लग्न केले. मुलीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. या मुद्द्यावरून दोन्ही कुटुंबांत वाद झाल्यानंतर हाणामारी झाली. यादरम्यान मुलाच्या आईचे कपडे फाडण्यात आले. मुलीचा भाऊ गुरशरण याने महिलेचा व्हिडीओ बनवून व्हायरल केला. पोलिसांनी आरोपीला अमृतसर बसस्थानकावरून अटक केली. आरोपी पंजाबमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात होते.