धक्कादायक! आणखी एका रुग्णालयात रॅगिंगच्या दहा विद्यार्थ्यांविरोधात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 05:28 PM2019-07-09T17:28:19+5:302019-07-09T17:31:19+5:30
आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी माहितीच्या अधिकारात काढलेल्या माहितीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
मुंबई - नायर रुग्णालयात डॉ. पायल तडवीने रॅगिंग कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी माहितीच्या अधिकारात काढलेल्या माहितीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय (कूपर) रुग्णालयातील दहा विद्यार्थ्यांविरोधात रुग्णालय प्रशासनाकडे रॅगिंगच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या प्रकरणात रुग्णालय प्रशासनाने थातुरमातुर कारवाई करत ही प्रकरण निकालात काढली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील शेख यांनी रुग्णालय प्रशासनाकडे रॅगिंगसंदर्भात विद्यार्थ्यांविरुद्ध आलेल्या तक्रारींबाबत माहिती मागितली होती. या माहिती संदर्भात जनमाहिती अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी हे.मि. सावंत यांनी माहिती पुरविले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात दहा विद्यार्थ्यांविरोधात रॅगिंगच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तरी 2016 मध्ये रॅगिंग संदर्भात 5 विद्यार्थ्यांविरुद्ध शिस्तभंग वर्तणूक केलेल्याबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच 2018 मध्ये रॅगिंगसंदर्भात 5 विद्यार्थ्यांविरुद्ध अर्वाच्य भाषेचा वापर आणि धमकाविणे याबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच रॅगिंग संदर्भात 2016 मध्ये या तक्रारी अनुषंगाने 5 विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वसतिगृहातून 6 महिन्यांकरीता निलंबित करण्यात आलेल्या आहे. 2018 मध्ये सदर तक्रारी अनुषंगाने 3 विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वसतिगृहातून 6 महिन्यांकरीता निलंबित करण्यात आलेल्या आहे.
तसेच रॅगिंगसंदर्भात कोणत्याही विद्यार्थ्यांला दंड आकारण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही. तसेच बरखास्ती करण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही आणि अद्यापपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्यांविरुद्ध रॅगिंगसंदर्भात गुन्हे नोंदविण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही अशी बेजबाबदार माहिती दिल्याचे शकील शेख यांनी सांगितले. हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय (कूपर) रुग्णालयातील अहवालानुसार सन 2015 पासून रॅगिंग विरोधी समितीच्या एकूण 11 बैठका पार पडल्या आहेत. तर रॅगिंगप्रकरणी समितीने आतापर्यंत 8 विद्यार्थ्यांवर फक्त 6 महिन्यांकरीता वसतिगृहातून निलंबनाची कारवाई केल्याच समितीचं म्हणणं आहे. रॅगिंगच्या तक्रारीविरोधात रॅगिंग विरोधी समितीने गांभीर्याने चौकशी करत नसून फक्त थातुरमातुर कारवाई करत आहे. ज्यामुळे वेळीच कारवाई केली डॉ.पायल तडवी आत्महत्यासारखी दुर्दैवी घटना घडू शकते असं मत आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय (कूपर) रुग्णालयात रॅगिंगच्या दहा विद्यार्थ्यांविरोधात तक्रार https://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) July 9, 2019
>