धक्कादायक! एक रुपया कमी दिला म्हणून दुकानदाराने ग्राहकावर फेकले उकळते तेल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 04:31 PM2019-06-19T16:31:21+5:302019-06-19T16:32:19+5:30
१ रुपयासाठी वाद पेटला; उकळते तेल ओतले अंगावर
लखनौ - समोसा विकत घेताना १ रुपया कमी दिला म्हणून निर्माण झालेल्या वादातून मिठाईच्या दुकान मालकाने कडईतील उकळते तेल तरुणाच्या अंगावर फेकले. उत्तर प्रदेशात मथुरा येथील रेतीया मार्केटमध्ये मंगळवारी ही धक्कादायक घटना घडली. पीडित तरुणाने भावाने सहा रुपयाचा समोसा विकत घेतला. मात्र, सुट्टे पैसे नसल्यामुळे त्याने पाचच रुपये दिले. अवघा एक रुपया कमी देण्यावरुन झालेल्या वादातून आरोपी सुरेश कुमार आणि त्याच्या मुलांनी दोन्ही भावांना मारहाण केली.
हेमराज आणि त्याचा भाऊ विष्णू (२२) रेतीया मार्केटमधील एका मिठाईच्या दुकानात गेले होते. तिथे त्यांनी ६ रुपयाचा एक समोसा विकत घेतला. मात्र, सुट्टे पैसे नसल्यामुळे त्याने पाचच रुपये दिले म्हणून सुरेश कुमार आणि त्याच्या मुलांनी विष्णूला मारहाण सुरु केली. त्यानंतर आरोपींनी कडईतून उकळते तेल दोन भावांच्या अंगावर फेकले असे हेमराजने पोलिसांना सांगितले. भावाला वाचवताना हेमराज मोठया प्रमाणात भाजला तर विष्णू पळाल्यामुळे त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. दुकान मालकाने उकळते तेल जाणीवपूर्वक फेकले की, अपघाताने हा प्रकार घडला त्याचा आम्ही तपास करत आहोत असे पोलिसांनी सांगितले. पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात भा. दं. वि. कलम ३२६, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.