धक्कादायक...मध्यान्ह आहारात मेलेला उंदीर सापडला; 9 विद्यार्थी अत्यवस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 10:20 PM2019-12-03T22:20:54+5:302019-12-03T22:22:39+5:30
या प्रकरणाची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे प्राथमिक शिक्षण मंत्री सतीश द्विवेदी यांनी याची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका शाळेमध्ये देण्यात आलेल्या मध्यान्ह आहारात चक्क मेलेला उंदीर सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे जेवण खाल्ल्याने विद्यार्थ्यांना उलट्या व्हायला सुरूवात झाली. या मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे प्राथमिक शिक्षण मंत्री सतीश द्विवेदी यांनी याची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. याशिवाय सरकारने एनजीओवर गुन्हा दाखल केला आहे.
मुझफ्फरनगरच्या पंचेडा भागात जनता इंटर कॉलेजमध्ये मंगळवारी सहावीच्या विद्यार्थांना मध्यान्ह आहार देण्यात आला. यावेळी एका डब्यामध्ये मेलेला उंदीर आढळला. तोपर्यंत काही विद्यार्थ्यांनी निम्मे जेवण उरकले होते. यापैकी 9 जणांची तब्येत बिघडली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठविण्यात आले.
या घटनेमुळे योगी सरकारचे शिक्षण मंत्री सतीश द्विवेदी यांनी सांगितले की, या प्रकरणावर तातडीने बैठक बोलावण्यात आली आहे. राज्यभरातील अशा प्रकारांवर चर्चा करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले आहे. एनजीओला काळ्या यादीत टाकण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.