चारित्र्यावर संशय, गरोदर पत्नीला निर्घृणपणे संपवलं आणि नंतर...; सैतान पतीचं धक्कादायक कृत्य उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 23:58 IST2025-03-05T23:57:31+5:302025-03-05T23:58:57+5:30
पोलिसांनी तपास केला असता, मयत महिलेच्या पतीने ओढणीने तिचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले.

चारित्र्यावर संशय, गरोदर पत्नीला निर्घृणपणे संपवलं आणि नंतर...; सैतान पतीचं धक्कादायक कृत्य उघड
Nashik Crime: चारित्र्याच्या संशयातून पतीनेच गरोदर पत्नीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. चांदशी शिवारात गोदाकाठी रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या झाडीझुडुपात कुजलेल्या अवस्थेत तालुका पोलिसांना एका गरोदर विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. महिलेसोबत घातपात झाल्याचे शवविच्छेदनातून उघड झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता, मयत महिलेच्या पतीने ओढणीने तिचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले. तालुका पोलिसांनी विवाहितेचा पती संशयित विकी राय सुकेसर (२०, रा. सातपूर, मूळ नेपाळ) यास मंगळवारी बेड्या ठोकल्या.
नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत चांदशी शिवारात गोदाकाठाशेजारून आनंदवली पुलाकडे जाणाऱ्या जुन्या चांदशी रस्त्यावर निर्जन भागात संशयित विकी हा त्याची पत्नी अमृताकुमारी सुकेसर (१९) हिला तीन ते चार दिवसांपूर्वी घेऊन गेला होता. येथील बाभळीच्या झाडांमधून टेकडीवर गेल्यानंतर तेथे ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून त्याने पळ काढला होता.
बायको बेपत्ता असल्याचा बनाव
शनिवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास विकी हा पंचवटी पोलिस ठाण्यात आला. त्याने २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी गांधी तलाव येथून त्याची पत्नी अमृताकुमारी ही बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी बेपत्ता नोंद करून घेतली होती. त्याने पत्नीला ठार मारल्यानंतर पोलिस ठाण्यात येऊन ती बेपत्ता झाल्याचा बनाव केल्याचे पोलिसांनी सांगितले.
चारित्र्यावर संशय
विकी याने पत्नी अमृताकुमारी हिच्या चारित्र्यावर संशय घेत त्या कारणातून गळा आवळून खून केल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आल्याचे पोलिस निरीक्षक सत्यजीत आमले यांनी सांगितले. हा मूळ नेपाळच्या सरलाई जिल्ह्यातील हरिपुवा गावातील रहिवासी असून, ते मागील काही महिन्यांपासून सातपूरच्या घाटोळ गल्लीत राहत होते. विकी हा मोलमजुरीची कामे करत होता.
शवविच्छेदनातून घातपात उघड
तालुका पोलिसांना सोमवारी बेवारसपणे महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यजीत आमले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकिय जिल्हा रुग्णालयात हलविले. मंगळवारी शवविच्छेदनातून घातपात उघड झाला. यानंतर पोलिसांनी शहरातील सातपूर, अंबड, पंचवटी, मेरी, म्हसरूळ आदी पोलिस ठाण्यांत मृतदेहाचे फोटो पाठविले असता, पंचवटी पोलिसांनी बेपत्ता असल्याची माहिती दिली. तालुका पोलिसांनी विकी यास चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यास खाक्या दाखविला असता, त्याने पत्नीच्या खुनाची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.