धक्कादायक ! लैंगिक अत्याचारामुळे बालिकेचा अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 06:37 PM2019-09-28T18:37:45+5:302019-09-28T18:39:22+5:30
शवविच्छेदन अहवालातून अत्याचार झाल्याचे निष्पन्न
औरंगाबाद : मजूर कुटुंबातील तीनवर्षीय चिमुकलीचा लैंगिक अत्याचारामुळेच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी सायंकाळी शवविच्छेदन अहवालातून समोर आली. मृत चिमुकलीचे आई-वडील भांडण करीत असल्याने रिक्षाचालकाने त्यांना रिक्षातून उतरविल्यानंतर दारूच्या नशेत तर्र असलेल्या पित्याने क्रांतीचौक रस्त्यावर चिमुकलीचा मृतदेह ठेवून गोंधळ सुरू केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चिमुकलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत दाखल केल्याने या घटनेचा पर्दाफाश झाला. दरम्यान, याप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
पीडितेचे वडील सचिन (नाव बदलले) हॉटेलमध्ये काम करतात. त्यांच्या कुटुंंबात पत्नी, १० वर्षांचा मुलगा, ८ वर्षांचा मुलगा, तीन वर्षांची निर्भया आणि अडीच महिन्यांची तान्हुली मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाला सोबत घेऊन सचिन हे २३ सप्टेंबर रोजी इगतपुरीला गेले होते. आधारकार्ड नसल्यामुळे त्यांना तेथे काम मिळू शकले नाही. यामुळे त्याच रात्री सचिन कुटुंबासह रेल्वेने परतीच्या प्रवासाला निघाले. तासाभरानंतर चुकून दुसऱ्याच रेल्वेत बसल्याचे त्यांना समजल्याने पुढील स्थानकावर उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला. राहुरी स्थानकावर रेल्वे थांबताच सचिन हे दोन्ही मुले आणि निर्भयासह उतरले. त्याचवेळी रेल्वे पुढील प्रवासाला निघाल्याने त्यांच्या पत्नीला तान्हुल्यासह उतरता आले नाही. पत्नीसोबत चुकामूक झाल्याने सचिन यांनी तीनवर्षीय निर्भया आणि तिच्या दोन्ही भावांसह राहुरी स्थानकावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांना तेथे अनोळखी व्यक्ती भेटला. सचिन व मुलांना आणि निर्भयाला त्याने वडापाव, चहा बिस्किटे खाण्यास दिली. रात्री स्थानकावर झोपल्यानंतर या नराधमाने निर्भयावर लैंगिक अत्याचार केला. २४ रोजी सकाळी ते झोपेतून उठले तेव्हा निर्भया रडत होती. गुप्तांगाला त्रास होत असल्याचे ती सांगत होती. मात्र, त्याने दुर्लक्ष केले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दखल
उपायुक्त निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त हनुमंत भापकर, पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांनी घटनेची माहिती जाणून घेतली. पोलीस उपनिरीक्षक जी.पी. सोनटक्के, उपनिरीक्षक अनिता बागूल आणि कर्मचारी या घटनेचा तपास करीत आहेत.
उपचाराऐवजी गंडेदोरे
सचिन आणि त्यांच्या पत्नीची मनमाड येथे भेट झाली. यानंतर हे कुटुंब २४ रोजी सायंकाळी औरंगाबादला आले. मनमाड येथे हॉटेलमध्ये काम मिळाल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी सचिन मुलाला घेऊन मनमाडला गेले. हॉटेलमालकाकडून एक हजार रुपये घेऊन निर्भयावर उपचार करण्यासाठी पत्नीला देण्यास सांगून मुलाला औरंगाबादला पाठविले. मुकुंदवाडीतील नातेवाईकांनी निर्भयाला भूतबाधा झाल्याचे सांगून बाबाकडून गंडेदोरे करण्याचा सल्ला दिल्याने निर्भयाची आई निर्भयाला दवाखान्याऐवजी २५ रोजी शनिशिंगणापूर येथील एका बाबाकडे घेऊन गेली. २६ रोजी सकाळी औरंगाबादेत परतली.
बसथांब्याजवळच चिमुकली कोसळली
घटनेपासून निर्भयाची प्रकृती चिंताजनक झाली होती. ती तिच्या आईला काहीच बोलू शकत नव्हती. अशा अवस्थेत तिची आई चिमुकलीसह शनिशिंगणापूर येथून मुकुंदवाडीतील नातेवाईकांकडे आली. तेथील नातेवाईकांनी चिकलठाण्यातील एका बाबाकडे निर्भयाला नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चिमुकलीला बाबाकडे नेण्यासाठी बसथांब्याजवळ आली तेव्हा तेथे निर्भयाला उलटी झाली आणि तिच्या नाका-तोंडातून रक्त पडले आणि ती कोसळली. यानंतर तिला जवळील नवजीवन रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा त्यांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
रात्रभर निर्भयाच्या मृतदेहाजवळ होते बसून
या घटनेची माहिती सचिन यांना कळविण्यात आली. रात्री अकरा वाजेच्या सुमारास सचिन हे मनमाडहून औरंगाबादेत पोहोचले. निर्भयाच्या मृतदेहाशेजारी तिची आई, दोन्ही भाऊ आणि अन्य नातेवाईकांनी रात्र काढली.
क्रांतीचौकात दारूच्या नशेत गोंधळ
शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ते निर्भयाचा मृतदेह, दोन्ही मुले, पत्नी आणि तान्हुल्या मुलीसह रिक्षातून बसस्थानकाच्या दिशेने जाऊ लागले, तेव्हा दारूच्या नशेत असलेल्या सचिनचे पत्नीशी भांडण सुरू झाले. यामुळे रिक्षाचालकाने सचिनसह कुटुंबाला क्रांतीचौकात उतरवून दिले. नंतर सचिनने रिक्षा थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षा थांबत नसल्याने निर्भयाचा मृतदेह रस्त्यावर ठेवून त्यांनी गोंधळ सुरू केला. ही बाब कळताच क्रांतीचौक पोलिसांनी तेथे जाऊन मृतदेहासह सर्वांना ताब्यात घेऊन ठाण्यात नेले. नंतर निर्भयाचे घाटीत शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात निर्भयावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया क्रांतीचौक ठाण्यात सुरू आहे.