धक्कादायक..! पुण्यात रुग्णाला मिळाले ‘एक्सपायरी डेटेड’ रक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 09:47 PM2018-10-20T21:47:20+5:302018-10-20T21:51:59+5:30
बारामती येथील योगेश लासुरे यांच्या पत्नीला स्तनाचा कॅन्सर असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने बी पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. लासुरे यांनी मंगळवार पेठेमधील ओम ब्लड बँकेतून रक्ताची पिशवी खरेदी केली.
पुणे : एक्स्पायरी डेट संपलेले रक्त एका रुग्णाला दिल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. मंगळवार पेठे येथील ओम ब्लड बँकेने एका रग्णाला मुदत संपलेले रक्त दिले. डॉक्टरांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने पुढील अनर्थ टळला.ही घटना शुक्रवारी (19 आॅक्टोबर) घडली. दरम्यान या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे (एफडीए) तक्रार केली आहे. त्यानुसार एफडीएने रक्तपेढीला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.
बारामती येथील योगेश लासुरे यांच्या पत्नीला स्तनाचा कॅन्सर असल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने बी पॉझिटिव्ह रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले. लासुरे यांनी मंगळवार पेठेमधील ओम ब्लड बँकेतून रक्ताची पिशवी खरेदी केली. रक्ताची पिशवी घेऊन ते रुग्णालयात आले. डॉक्टरांनी पिशवी वरील एक्स्पायरी डेट पाहिल्यावर त्यांनी रुग्णाला ते रक्त देण्यास नकार दिला. रक्ताच्या पिशवीवर १० आॅक्टोबर २०१८ ही एक्सपायरी डेट होती. ही गोष्ट लक्षात येताच लासुरे यांनी तत्काळ ओम ब्लड बँकेशी संपर्क साधला. यावेळी चुकीने रक्ताच्या पिशवीवर पुढील महिन्याऐवजी या महिन्यातील 10 तारीख एक्स्पायरी डेट म्हणून टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले. घडलेल्या प्रकाराबाबत लासुरे यांनी एफडीएकडे तक्रार केली. या तक्रारीवरुन एफडीएने कारवाईला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे क्लेरिकल मिस्टेकमुळे हा प्रकार घडल्याचा दावा ओम ब्लड बँकेकडून करण्यात येत आहे.