धक्कादायक! 'व्हाट्स अॅप' ग्रुप'मधून काढून टाकल्याने मारामारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 04:13 PM2020-03-02T16:13:23+5:302020-03-02T16:32:35+5:30
६० वर्षांच्या नातेवाइकांसह तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
पुणे : ' व्हाट्स अॅप ' हा आता लोकांच्या जणू जीवन-मरणाचा प्रश्न बनला आहे़ एकमेकांचे नातेवाईक असलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढून टाकल्याने जाब विचारण्यासाठी गेलेल्यांमध्ये मारामारी झाली. त्यावरुन तिघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मगरपट्टा सिटीमध्ये २९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता घडली आहे.याप्रकरणी २५ वर्षांच्या महिलेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.त्यावरून हडपसर पोलिसांनी तिघाविरुद्ध विनयभंग करणे, दुखापत करणे अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी तरुणी व आरोपी हे नातेवाईक आहेत़ त्यांच्या नातेवाइकांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. त्यामधून एकाला काढून टाकायला लावले़ याचा जाब विचारण्यासाठी ही महिला, तिचे पती, सासू-सासरे असे सर्व मिळून शनिवारी रात्री मगरपट्टा सिटी येथील आरोपीच्या घरी गेले. त्यावेळी त्यांचा वादावादी झाली. तेव्हा आरोपी व त्यांच्या नातेवाइकांनी फिर्यादी यांना अश्लील शिवीगाळ करुन धमकी दिली. फिर्यादी यांच्या अंगावर जाऊन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. हडपसर पोलिसांनी ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकासह तरुणाला ताब्यात घेतले आहे.
व्हॉट्सअॅप गु्रपमध्ये एखाद्याला काढून टाकणे अथवा घेणे हे आता लोकांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा होऊ लागला आहे.किरकोळ वाटणाऱ्या अशा घटना किती गंभीर होऊ शकतात, हेच यावरुन दिसून येत आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुपवरून एखाद्याला काढून टाकताना संबंधित दुखावला जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे दिसून येत आहे. हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहे.