धक्कादायक..! नाशिकमध्ये पाच अल्पवयीन मुलींवर आश्रम संचालकाकडून लैंगिक अत्याचार
By अझहर शेख | Published: November 26, 2022 10:46 PM2022-11-26T22:46:23+5:302022-11-26T22:47:05+5:30
म्हसरूळ शिवारातील द किंग फाउंडेशन नावाच्या संस्थेकडून चालविले जाणारे ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात एका अल्पवयीन मुलीवर महिनाभरापूर्वी तेथील संचालक संशयित हर्षल मोरे याने बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती.
अझहर शेख, नाशिक
नाशिक : शहरातील म्हसरूळ शिवारातील एका ज्ञानदिप गुरुकुल आधाराश्रमात चौदा वर्षांच्या शाळकरी मुलीवर आधाराश्रमाच्या संचालकाकडून बलात्कार केल्याची घटना गुरुवारी (दि. २४) सकाळी उघडकीस आली होती. पोलिसांनी आधाराश्रमातील अन्य निवासी मुलींचाही जबाब नोंदवला. चार मुलींच्या जबाबातून त्यांच्यावरही लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. या जबाबानुसार पोलिसांनी संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे (२८) याच्यावर आणखी गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या. अटकेत असलेल्या हर्षल मोरे ऊर्फ सोनू सरविरुद्ध वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून शनिवारी (दि.२६) रात्री उशीरापर्यंत म्हसरुळ पोलीस ठाण्यात कारवाई सुरू होती.
म्हसरूळ शिवारातील द किंग फाउंडेशन नावाच्या संस्थेकडून चालविले जाणारे ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात एका अल्पवयीन मुलीवर महिनाभरापूर्वी तेथील संचालक संशयित हर्षल मोरे याने बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती. पिडितेला संशयित हर्षल मोरे उर्फ सोनू सर याने १३ ऑक्टोबर २०२२ रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास इमारतीच्या पार्किंगमधील पत्र्याच्या खोलीत बळजबरीने हात धरून नेले होते. तेथे स्वत:चे हातपाय दाबून देण्याच्या बहाण्याने पिडितेला अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत तिने म्हटले आहे. पीडित फिर्यादी मुलगी घाबरून आधाराश्रमातील खोलीत गेली. तेथे तिने घडलेला प्रकार तिच्यासोबतच्या अन्य मुलींना सांगितला. यावेळी काही मुलींनी हर्षल सरांनी आमच्यासोबतसुद्धा असाच प्रकार केला होता, असे सांगितले, असे पिडितेने असा उल्लेखसुद्धा फिर्यादीमध्ये केला आहे. यामुळे पोलिसांनी या दिशेनेही अधिक सखोल तपास करत मुलींचे जाबजबाब नोंदविले. यामधून चार ते पाच मुलींसाेबत लैंगिक अत्याचार केल्याचे जबाबात म्हटले आहे. या जबाबानुसार पोलिसांनी संशयित हर्षलविरुद्ध आणखी पाच बलात्काराचे गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या ाआहेत. पिडित पाचही मुलींची वैद्यकिय तपासणीही करण्यात आली असून त्यांचे अहवाल शनिवारपर्यंत पोलिसांना प्राप्त झालेले न्हवते.
संशयित हर्षलच्या अडचणींमध्ये वाढ; बुधवारपर्यंत पोलीस कोठडी
ज्ञानदीप आधाराश्रमाचा संचालक संशयित हर्षल मोरे यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याला जिल्हा सत्र न्यायालयाने त्यास येत्या बुधवारपर्यंत (दि.३०) पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्याच्याविरुद्ध गुरूवारी एका पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम (ॲट्राॅसिटी) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. यानंतर अन्य चार ते पाच मुलींनीसुद्धा त्यांच्या जबाबाबत संशयित हर्षल याने लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगितले. यानुसार म्हसरुळ पोलिसांनी संशयिताविरुद्ध बलात्कार, पोक्सोअन्वये वाढीव गुन्हे रात्री उशीरापर्यंत दाखल केल्याचे सुत्रांनी सांगितले.