धक्कादायक ! जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार; खेड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 11:55 AM2020-08-12T11:55:06+5:302020-08-12T12:24:43+5:30
पीडित तरुणी सहा महिन्याची गर्भवती राहिल्याने या प्रकाराला फुटली वाचा...
राजगुरुनगर; कनेरसर (ता. खेड ) येथे मतिमंद मुलीवर बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी सहा महिन्याची गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संशयित महेश पोपट दौंडकर यांच्या विरोधात मुलीच्या आईने खेडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पीडित मुलगी जन्मजात मतिमंद आहे. सहा महिन्यापुर्वी मुलीच्या घरातील आईवडील शेतात कामासाठी व दोन लहान बहिणी शाळेत गेल्यावर पीडित मुलीच्या घराशेजारी राहणारा संशयित महेश दौंडकर याने घरी व आजुबाजुला कोणी नसल्याचा फायदा घेत मतिमंद मुलीच्या घरात जात जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर नंतर जीवे मारण्याची धमकी देत असे. दरम्यान, काही दिवसांनी पीडित मुलगी आजारी असल्याने आईवडिलांनी तिला उपचारासाठी खासगी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगितले होते.
आई वडिलांनी तिला मोशी येथील चैतन्य महिला संस्था येथे दाखल केले होते. या घटनेबाबत चैतन्य महिला संस्थेने खेड पोलिसांना माहिती दिली होती.खेड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस सुरेखा भोर यांनी पीडित मुलीचे समुपदेशन करुन विचारले असता तिने घराशेजारील महेश दौंडकर उर्फ पिंट्या याने घरी कोणी नसल्याचा फायदा घेत बलात्कार केला तसेच याबद्दल कोणास काही सांगितले तर जीवे मारून टाकीन अशी धमकी दिल्याचे सांगितले. भीतीपोटी अत्याचार झालेल्या मुलीने याबाबत कोणास काही सांगितले नाही. मात्र, ६ महिन्याची गर्भवती राहिल्याने याला वाचा फुटली आहे.
याबाबत संशयित आरोपी महेश दौंडकर यांच्या विरुध्द खेड पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने गुन्हा दाखल केला आहे. तसेच अल्पवयीन मुलीवर घरात कोणी नसल्याचा फायदा घेत शेजारीच राहणार्या दौंडकर या नराधमाने बलात्कार केला आहे. त्याचप्रमाणे मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरी केली.आरोपीला कठोर शासन करीत आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी पीडित मुलीच्या आईवडिलांनी केली आहे.
याप्रकरणाचा पुढील तपास खेड उपविभागीय पोलिस आधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सतिश गुरुव, सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश बडाख, हवालदार बाळकृष्ण साबळे, महिला पोलिस हवालदार सुरेखा भोर करत आहे.