धक्कादायक! आमदार कोट्यातील घर देतो सांगून महिला अधिकाऱ्याची २५ लाखांना फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 07:46 AM2024-08-13T07:46:34+5:302024-08-13T07:47:07+5:30

फसवणुकीसाठी धनंजय मुंडे यांच्या बनावट शिफारस पत्राचा वापर

Shocking Fraud of 25 lakhs with woman officer by saying will give house in MLA quota | धक्कादायक! आमदार कोट्यातील घर देतो सांगून महिला अधिकाऱ्याची २५ लाखांना फसवणूक

धक्कादायक! आमदार कोट्यातील घर देतो सांगून महिला अधिकाऱ्याची २५ लाखांना फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आमदार कोट्यातून ७५ लाखांचे घर ४५ लाखांत मिळवून देण्याचे आमिष दाखवून विधि खात्यातील एका ३२ वर्षीय महिला अधिकाऱ्याची २५ लाखांना फसवणूक करण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये आरोपींनी आमदारधनंजय मुंडे यांच्या बनावट शिफारस पत्राचा वापर केला आहे. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी गोविंद गांगण आणि कमलाकर भुजबळ यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

लालबाग येथे राहणाऱ्या या महिला अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार, त्यांनी आपल्या वडिलांचे वर्गमित्र कमलाकर भुजबळ यांच्याकडे स्वस्तात घराबाबत चौकशी केली होती. तेव्हा भुजबळ याने सातरस्ता येथे घर दाखवले. घराची किंमत ७५ लाख असून आमदार कोट्यातून   ४५ लाखांमध्ये व्यवहार करून देण्याचे त्याने आमिष दाखवले. ठरल्याप्रमाणे जानेवारीमध्ये सातरस्ता येथील एसआरए इमारतीखाली घर बघायला जाताच तेथे गोविंद काशीराम गांगण यांची ओळख करून दिली. गांगणने तो राजकारणात सक्रिय असून राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता असल्याचे सांगितले. येथील २३ मजली इमारतीचे  बांधकाम पूर्ण झाले असून लाईट फिटिंगचे काम सुरु होते. येथील घर आवडल्याने त्यांनी १० फेब्रुवारी २०२१ रोजी गांगणला १५ लाखांची रोकड दिली. उर्वरित ३० लाख रुपये गृहकर्जाद्वारे देणार असल्याचे सांगितले. मात्र, गृहकर्जासाठी बराच वेळ लागणार असल्याचे सांगून गांगणने स्वतः कर्ज प्रक्रिया करण्यास सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी गांगणने धनंजय मुंडे यांचे शिफारस पत्रही दाखवले. त्यामध्ये तरुणींसह आणखी एकाच्या नावाचा समावेश होता. या पत्रात आर्थिक दुर्बल घटक अंतर्गत घर देण्याची मुंडे यांनी शिफारस केल्याचे भासवले होते. महिला अधिकाऱ्याने या पत्राची प्रत मागताच गांगणने ते देण्यास नकार दिला. पुढे आणखी पैशांची मागणी करत सहा लाख रूपये उकळले.

२५ लाख उकळले

तक्रारदाराने पाच टप्प्यांमध्ये दिलेल्या २१ लाखांबाबत करारनामा करण्यात आला. मात्र पैसे देऊन सहा ते सात महिने उलटल्यानंतर देखील घराचा ताबा मिळाला नाही. तेव्हा महिला अधिकाऱ्याने सातरस्ता येथील इमारतीबाबत अधिक चौकशी केली असता संबंधित इमारतीचे प्रकरण गेल्या १२ वर्षांपासून कोर्टात प्रलंबित असल्याचे समोर आले. याबाबत जाब विचारताच गांगणने ४५ लाखांत दोन फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते.

Web Title: Shocking Fraud of 25 lakhs with woman officer by saying will give house in MLA quota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.