धक्कादायक ! स्मशानभूमीच्या वादातून ग्रामपंचायतीसमोर केला अंत्यविधी; ७३ जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 02:19 PM2020-08-03T14:19:28+5:302020-08-03T14:30:36+5:30
ही घटना शनिवारी भोकरदन तालुक्यातील राजूर (जि. जालना) येथे घडली होती.
राजूर (जि. जालना) : ग्रामपंचायतीच्या प्रांगणात वीरशैव लिंगायत समाजाच्या परंपरेनुसार वृद्ध महिलेच्या पार्थिवावर अंत्यविधी केल्याप्रकरणी शिवा संघटनेचे संस्थापक प्रा. मनोहर धोंडे यांच्यासह ७३ जणांवर राजूर पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी भोकरदन तालुक्यातील राजूर (जि. जालना) येथे घडली होती.
राजूर येथील शिवा संघटनेच्या शाखेची गत दहा वर्षापासून लिंगायत समाजाला स्वतंत्र स्मशानभूमीसाठी जागा देण्याची मागणी आहे, परंतु या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यातच शनिवारी समाजातील एका ८० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झाल्याने अंत्यविधीचा प्रश्न निर्माण झाला. शिवा संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधवांनी मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आणून वीरशैव लिंगायत समाजाच्या परंपरेनुसार अंत्यविधी केला. त्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समाजबांधवांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी संतोष शिंदे यांनी राजूर पोलिसात तक्रार दिली.
त्यांनी फिर्यादीत म्हटले, ‘नियोजित कट करून बेकायदेशीररीत्या मंडळी जमवून व ग्रामपंचायतच्या आवारात सरकारी कामात अडथळा आणला व जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ शकतो याची माहिती असतानाही ग्रामपंचायत आवारात अंत्यविधी केला. तसेच प्रा. धोंडे यांनी दूरध्नवनीवरुन समाजाला गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.’ या फिर्यादीवरून प्रा. मनोहर धोंडे, सतीश तवले, कैलास गबाळे, भीमाशंकर दारूवाले, मनमथ दारूवाले, रामेश्वर जीतकर, रमेश जीतकर, गणेश हिंगमीरे, भाऊसाहेब कोमटे, गजानन आगलावे, स्वप्नील दारूवाले, भरत कोमटे, कैलास पुंगळे, सुनील कोमटे, राम कोमटे, गणेश फुटाणकर, शैलेश देशमाने, रमाकांत हिंगमीरे यांच्यासह ७३ महिला-पुरूषांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. संतोष घोडके हे करीत आहेत.