धक्कादायक! हैदराबादचा 300 कोटींचा महाल परस्पर विकला; कंपनीचा राजीनामा दिला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 11:45 AM2019-10-05T11:45:37+5:302019-10-05T11:46:48+5:30
मुंबई आणि नवी मुंबई परिसरात निहारिका इन्फ्रास्ट्रक्चरचे निवासी आणि व्यापारी प्रकल्प सुरू आहेत.
मुंबई : मुंबईच्या एका बांधकाम कंपनीला दोन माजी कर्मचाऱ्यांनी चुना लावला आहे. हैदराबादमधील तब्बल 300 कोटींच्या किंमतीचा निजामाचा महलाची परस्पर विक्री केली आहे. महत्वाचे म्हणजे हा महल काश्मीरच्या एका हॉटेल व्यायसायिकाला विकून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिल्याचा आरोप कंपनीने केला आहे. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे कंपनीने गुन्हा नोंदविला आहे.
मुंबई आणि नवी मुंबई परिसरात निहारिका इन्फ्रास्ट्रक्चरचे निवासी आणि व्यापारी प्रकल्प सुरू आहेत. कंपीनीच्या तक्रारीनुसार माजी कर्मचारी सुरेश कुमार आणि सी रविंद्र यांचा यामध्ये हात आहे. या दोघांनी हैदराबादच्या मालमत्तेची कंपनीला अंधारात ठेवून विक्री केली आहे. निहारिका कंपनीने ही 100 वर्षे जुनी मालमत्ता तीन वर्षांपूर्वी नजरी बाग पॅलेस ट्रस्टकडून विकत घेतली होती. हैदराबादच्या हैदरगुडामध्ये हा महाल किंग कोठीच्या नावाने प्रसिद्ध होता.
कंपनीचे काही कर्मचारी जेव्हा हैदराबादच्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये गेले तेव्हा त्यांना या पॅलेसची विक्री झाल्याचे पाहून धक्का बसला. या महालाची मालकी आयरिस हॉस्पिटॅलिटीला देण्यात आल्याचे समजले. या प्रकरणाची कंपनीने चौकशी केली असता सुरेश कुमार आणि सी रविंद्र यांचे नाव समोर आले. त्यांनीच आयरिस कंपनीशी सौदा केला होता. यानंतर या दोघांनी फेब्रुवारीमध्येच कंपनीला रामराम ठोकला होता. आता पोलिस या दोघांचा शोध घेत आहे.
या दोघांनी हैदराबादच्या रजिस्ट्रर ऑफिसमध्ये बनावट कागदपत्र जमा केल्याची शक्यता एका पोलिस अधिकाऱ्यांने व्यक्त केली. तसेच या प्रकरणात त्यांना हैदराबमधील कोणीतरी मदत केल्याचाही संशय आहे.
हैदराबादचा निजाम वास्तव्य करायचा
किंग कोठी पॅलेस हा 2.5 लाख स्क्वेअर फूट क्षेत्रफळाचा होता. भारतात विलिन होण्याआधी शेवटचा निजाम याच पॅलेसमध्ये राहत होता, असे सांगितले जाते. या निजामाचा मृत्यू 1967 मध्ये झाला. निजामाने ही मालमत्ता प्रसिद्ध आर्किटेक्ट कमाल खान यांच्याकडून खरेदी केली होती. यानंतर निजामाने याचे नाव नजरी बागवरून बदलून किंग कोठी ठेवले होते.