एम्स रुग्णालयातील धक्कादायक घटना; आजाराला कंटाळून रुग्णाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 07:11 PM2018-07-20T19:11:08+5:302018-07-20T19:11:47+5:30
किडनीच्या आजाराने त्रस्त रुग्णाने रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली
कल्याण - गेल्या अनेक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रासलेल्या एका पुरुष रुग्णाने आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एम्स रुग्णालयातील चौथ्या माळ्यावरून उडी मारून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली. गोकुळ थोरात (वय - 50) असे या रुग्णाचे नाव असून एम्स रुग्णालयात उपचार घेत होता.
कोपर येथे राहणारे गोकुळ थोरात हे अनेक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. डोंबिवली पूर्वेकडील एम्स रुग्णालयात त्यांची डायलेसीसची ट्रिटमेण्ट सुरू होती. काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने त्यांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, या आजारामुळे ते त्रस्त झाले होते. या त्रासातून आज सकाळी त्यांना स्पंजिंग करून नर्स गेल्यानंतर त्यांनी रुग्णालयाच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. मानपाडा पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू केली आहे. दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून या रुग्णालयालाच्या खिडक्यांना ग्रील बसवण्याची तसदी रुग्णालय प्रशासनाने घेतली नसून रुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी हि रुग्णालायची असल्याने रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड झाला आहे .