धारावीतील धक्कादायक घटना; रेल्वे अधिकाऱ्याला घरात डांबून मारहाण करत काढला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 04:57 PM2021-12-16T16:57:34+5:302021-12-16T17:10:34+5:30
Shocking incident in Dharavi :व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून ६ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना धारावीत घडली आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी एका तरुणीसह तिच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मनीषा म्हात्रे
मुंबई : 'अंकल अंदर आओ... असे म्हणत तरुणीच्या बोलावण्यावरुन तिच्या घरात जाणे एका रेल्वे अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. घरात जाताच तरुणींसह तिच्या नातेवाईकांनी रेल्वे अधिकाऱ्याला बेदम चोप दिला आणि तरूणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे कबूल करुन घेत त्याचा व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून ६ लाख रुपये उकळल्याची धक्कादायक घटना धारावीत घडली आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी एका तरुणीसह तिच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सेंट्रल रेल्वेत कार्यरत असलेले ४६ वर्षीय तक्रारदार हे रेल्वे वसाहतीत कुटुंबियांसोबत राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यापूर्वी ते धारावीतील नित्यानंद चाळीत रहात होते. त्यांच्या शेजारी राहण्यास असलेल्या तरुणीसह तिच्या कुटुंबियासोबत त्यांचे घरचे संबंध होते. गेल्यावर्षी त्यांनी दुसरीकडे राहण्यास जात असल्याने शेजारच्या तरुणीला मोबाईल विकत घेण्यास पैशांची मदत केली होती. त्यापैकी ९ हजार रुपये तिने परत केले. चार हजार रुपये देणे बाकी होते.
तरुणीने २९ जानेवारी रोजी तरुणीने कॉल करून सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घरी येऊन पैसे घेऊन जाण्यास सांगितले. ते तरुणीच्या घरी पोहचले. दरवाजातच उभ्या असलेल्या तरुणीने 'अंकल अंदर आओ' असे बोलून घरात नेले. त्यावेळी घरामध्ये, तिच्या आत्याचा मुलगा आनंद, त्याची पत्नी, बहीण आणि मित्र राँजर बेनी असे हजर होते. तक्रारदार हे घरात जाताच, एकाने दरवाजा बंद करत, तरुणीसोबत काय संबंध आहे? म्हणत त्यांना शिवीगाळ सुरु केली. काही समजण्याच्या आतच त्यांना लाथाबुक्क्यांसह हातात मिळेल त्या वस्तूने मारहाण सुरु केली. तरुणीसोबत संबंध असल्याचे त्यांना कबुल करण्यास सांगत एकाने व्हिडीओ बनविला. यावेळी त्यांना जीवेठार मारण्याची धमकी दिल्याने तक्रारदार यांनी भितीने होकार दिला.
काय सांगता! चोरट्याने थेट बिट चौकीतूनच पळवला पोलिसाचा लॅपटॉप; सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद
पुढे हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्यांनी १० लाखांची मागणी केली. पुढे, पैसे घेवूनही व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांना घर सोडुन जाण्यासाठी तगादा लावला. अखेर त्यांच्या त्रासाला कंटाळून तक्रारदार हे गेल्या महिन्यात रेल्वे वसाहतीत राहण्यास गेले. त्यानंतर, धाडस करून पोलिसांत धाव घेत तक्रार दिली आहे.
पीएफ खाते केले रिकामी ...
तक्रारदार यांच्याकडे पैसे नसल्याने आरोपीनी त्यांना पीएफ खात्यातून पैसे काढण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी पीएफमधून ६ लाख रुपये काढून आरोपीना दिले आहे.
अद्याप अटक नाही...
तरुणीसह तिच्या नातेवाईकाविरुद्ध गुन्हा नोंदवून अधिक तपास सुरु आहे. अद्याप कुणाला अटक करण्यात आलेली नाही. - बळवंत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, धारावी पोलीस ठाणे