भिवंडीत धक्कादायक प्रकार! घराला आग लावून पती-पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
By नितीन पंडित | Updated: December 28, 2024 15:48 IST2024-12-28T15:43:58+5:302024-12-28T15:48:27+5:30
सुदैवाने शेजारील लोकांच्या मदतीने पत्नी फरिन आसिफ कुरेशी, पती आसिफ कुरेशी दोघेही बचावले

भिवंडीत धक्कादायक प्रकार! घराला आग लावून पती-पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरातील निजामपुर पोलिस ठाणे हद्दीत कुरेशी नगर परिसरत पती पत्नी झोपले असताना त्या घराला आग लावून जळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री उघडकीस आला आहे.ज्यामध्ये पती पत्नी भाजल्याने जखमी झाले आहेत. फरिन आसिफ कुरेशी व पती आसिफ कुरेशी अशी जखमी पती-पत्नींची नावे आहेत. दोघेही घरात झोपले असताना मध्यरात्री सुमारे तीन-साडे तीन वाजताच्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नी घरात असताना अज्ञात व्यक्तीने घराच्या दरवाज्यावर पेट्रोल टाकून आग लावून दिली. आरोपी फरार झाले. यावेळी हल्लेखोराने घराच्या मागील दरवाजाचीही बाहेरून कडी लावली होती. आगीने पेट घेताच घरात धूर जमा झाल्याने झोपेत असलेले दोघे पती-पत्नी जागे झाले. त्यांनी आरडाओरड करत दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तो दरवाजाही बाहेरून बंद असल्याने दोघांनी आरडाओरड केल्याने शेजारी जागे होऊन घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली.
या दरम्यान पती-पत्नी हे आग विझविण्याचा प्रयत्न करत असताना भाजल्याने जखमी झाले आहेत. स्थानिकांनी या दोघांना उपचारासाठी भिवंडीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले असून घटनास्थळी स्थानिक निजामपूर पोलिस व फॉरेन्सिक पथक दाखल होत घटनेचा तपास करत आहेत.