जालन्यातील धक्कादायक प्रकार, अवैध गर्भपात केंद्राचा भंडाफोड; 8 जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 11:06 AM2022-05-02T11:06:51+5:302022-05-02T11:06:59+5:30

अवैध क्लिनीक चालवणारा डॉक्टर फरार असून, पोलिसांनी गर्भपातासाठी वापरणारे किट जप्त केले आहे.

Shocking incident of Jalana, police bust of illegal abortion clinic | जालन्यातील धक्कादायक प्रकार, अवैध गर्भपात केंद्राचा भंडाफोड; 8 जणांविरुद्ध गुन्हा

जालन्यातील धक्कादायक प्रकार, अवैध गर्भपात केंद्राचा भंडाफोड; 8 जणांविरुद्ध गुन्हा

Next

विजय मुंडे
जालना :
येथील भोकरदन मार्गावरील डॉ.सतीश गवारे यांच्या राजूरेश्वर क्लिनिकवर आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी धाड टाकून तेथे अवैधरित्या गर्भलिंगनिदान व गर्भपात होत असल्याचा भंडाफोड केला. याप्रकरणी आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाईचा सुगावा लागल्याने डॉ. गवारे सोनोग्राफी मशिनसह फरार झाला आहे.

आरोग्य विभागाचे पथक राजुरेश्वर क्लिनिकमध्ये गेले असता एका महिलेला गर्भपाताच्या गोळ्या देऊन बसविल्याचे आढळून आले. केंद्रातील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर डॉ. गवारे महिलांचे गर्भलिंग निदान करण्यासाठी १५ ते २० हजार रुपये तर गर्भपात करण्यासाठी १८ ते २० हजार रुपये घेत असल्याचे समोर आले. या प्रकरणात डॉ. अर्चना भोसले यांच्या तक्रारीवरून संदीप राजू भानुदास पवार, सुनीता सुभाष सासणे, कौशल्या नारायण मगरे, फरार असलेले डॉ. सतीश बाळासाहेब गवारे, एजंट संदीप गोरे, डाॅ. पूजा विनोद गवारे, रुग्ण घेऊन येणाऱ्या डॉ. प्रिती मोरे, औषधी पुरविणाऱ्या स्वाती गणेश पाटेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

किट साहित्य जप्त

डॉ. गवारे याच्या राजुरेश्वर क्लिनिकमध्ये चायनिज अल्ट्रासाऊंड मशीन आहे. अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यासाठी नोंदणीकृत नसलेली ही मशीन डॉ. गवारे वापरत होता. गर्भपातासाठी असलेले तीन एमटीपी किट, एक वापरण्यात आलेली किट आढळून आली. तसेच डॉक्टरांचे रेफर बुक, रजिस्टर, एमटीपी किट, रोख रक्कम, रुग्णालयातील सलाईन आदी साहित्य जप्त करण्यात आले.

ती माता सुखरूप
पथकाने अवैध गर्भपात केंद्रावर कारवाई केली तेव्हा तेथे एक महिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊन बसली होती, तत्काळ त्या महिलेला जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे गेल्यानंतर दहा मिनिटांमध्ये त्या महिलेचा गर्भपात झाला.

Web Title: Shocking incident of Jalana, police bust of illegal abortion clinic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.