लग्नासाठी वडिलांना पेट्रोल टाकून जाळलं, धक्कादायक घटनेनं सोलापूर जिल्हा हादरला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 01:49 PM2023-01-01T13:49:31+5:302023-01-01T13:58:21+5:30
लातूर येथील एका अल्पवयीन मुलीसोबत सोहेल बागवानचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते
सोलापूर - प्रेमाच्या वेडात कोण काय करेल याचा नेम नाही. एका अल्पवयीन मुलीसोबत लग्न करण्यास वडिलांनी नकार दिल्याने मोठं हत्याकांड घडलं आहे. संबंधित मुलीशी लग्न करण्यास विरोध करणाऱ्या बापाला स्वतःच्या मुलानेच पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात घडलेल्या या घटनेनं सोलापूर जिल्हा हादरला. सोहेल बागवान असं आरोपी मुलाचे नाव असून ३० डिसेंबर रोजी ही घटना घडल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांनी दिली. याप्रकरणी लातूर येथील एक अल्पवयीन मुलांसह तीच्या अल्पवयीन भावालाही पोलिसांनी अटक केली आहे.
लातूर येथील एका अल्पवयीन मुलीसोबत सोहेल बागवानचे काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही लग्न करणार होते. परंतु, त्यांच्या लग्नास वडिल अफजल बागवान यांचा विरोध होता. त्यामुळे सोहेल हा आपल्या वडिलांवर चिडून होता. दरम्यान अल्पवयीन मुलगी व तीचा भाऊ शुक्रवारी सकाळी लातूर येथून पंढरपुरात आले होते. पंढरपुरातील नवीन एसटी बस स्थानकासमोर त्यांनी सोहेल बागवान याची भेट घेतली. त्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि तीच्या भावाने तहसील कार्यालयाजवळ जावून अफजल बागवान यांची भेट घेवून कासेगाव येथे मामाकडे जायचे आहे असे खोटे सांगून रिक्षात बसवून नेले.
पंढरपूरपासून काही अंतरावर गेल्यानंतर मध्येच रिक्षा थांबवून ते पायी पुढे गेले. दरम्यान रस्त्यात दबा धरून बसलेल्या सोहेल बागवान याने वडील अफजल बागवान यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यावेळी सोबत असलेल्या अल्पवयीन मुलीने व तीच्या भावाने अफजल बागवान यांचे हातपाय बांधून डोक्यात दगड घालून खून केला. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेनं जिल्हा हादरला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.