शॉकींग! आईनेच पोटच्या लेकरांचं मुंडकं धडावेगळं केलं; सासऱ्यांना केला फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 08:55 AM2024-02-28T08:55:41+5:302024-02-28T08:58:23+5:30
रस्त्यावर बोगद्यालगत ही घटना घडली. घटनेनंतर घरातच छोटा प्रणव रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता
लक्ष्मण कांबळे
सोलापूर/कुईवाडी : घरात सर्वांनी एकत्रितपणे जेवण केले.. आजी-आजोबा एका नातेवाइकांच्या लग्नाला गेले.. सहा वर्षीय चिमुरड्याचे पप्पाही कामानिमित्त बाहेर पडले.. मग, मुलगा अन् आईने जवळच बाळाच्या चुलत आजोबांकडे जाऊन चहा- बिस्कीटदेखील घेतले अन् घरी परतले. साडेनऊ ते सव्वाबाराच्या दरम्यान त्या मातेने आजी-आजोबांच्या लाडक्या नातवाचे शीर कुन्हाडीने छाटून धडावेगळे केल्याची क्रूर घटना माढा तालुक्यात कव्हे येथे घडली. त्यानंतर मुलाची हत्या करून सासऱ्याला फोन करून सांगितले.
हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेने जिल्ह्याला हादरवून टाकले. या घटनेनंतर चिमुरड्याच्या आईनेही तणनाशक औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून, तिच्यावर कुर्डूवाडी येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. मुलाच्या हत्येमागील कारणाचा उलगडा पोलिसांकडून झालेला नाही. प्रणव गणेश चोपडे (वय ६, रा. कव्हे, ता. माढा) असे मृत बाळाचे नाव असून, सोमवारी सकाळी ९:३० ते १२:१५ वाजेदरम्यान कव्हे-महादेव वाडी
रस्त्यावर बोगद्यालगत ही घटना घडली. घटनेनंतर घरातच छोटा प्रणव रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. जवळच एक कुन्हाड, झाडू, पायाच्या खुणा दिसत होत्या. त्याचे शीरही धडावेगळे बाजूला होऊन पडले होते. घटनेची माहिती मिळताच करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपात्रे, पोलिस उपनिरीक्षक सारिका गुटकुळ यांच्यासह ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार करीत आहेत.
आजीने फोडला हंबरडा..
मृत नातू प्रणव हा आजोबा आप्पा व आजी इंदूबाई या दोघांचा खूप लाडका होता. कायम तो आजीभोवती हट्ट करत फिरायचा. त्याचे लाडही दोघे पुरवायचे. नेहमी आजीसोबत असणारा नातू त्या दिवशी घरीच राहिला, अशी आठवण आजी इंदूबाई घरी भेटायला आलेल्या प्रत्येक पाहुण्याला मंगळवारी सायंकाळपर्यंत हंबरडा फोडून सांगत होत्या.
ही घटना समाजमनाला सुन्न करणारी आहे. आई व मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी आहे. घटनेत वापरलेले सर्व साहित्य घटनास्थळावरून जप्त करण्यात आले आहे. या घटनेतील बाळाला मारणारी आईदेखील तणनाशक औषध प्यायल्याने अद्याप बेशुद्धावस्थेत आहे. ती शुद्धीवर आल्यानंतर घटनेतील सत्यता समोर येणार आहे.
- सुरेश चिल्लावर, पोलिस निरीक्षक, कुडूवाडी