धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 10:02 PM2024-10-03T22:02:52+5:302024-10-03T22:04:49+5:30
हल्लेखोरांनी चौघांवर अंदाधूंद गोळीबार केला. 5 आणि 2 वर्षीय चिमुकल्यांनाही सोडले नाही.
UP Crime : उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात एक मोठी घटना घडली आहे. घरात घुसून एका सरकारी शिक्षकासह त्यांची पत्नी आणि चिमुकल्या दोन मुलांची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. मात्र, तोपर्यंत आरोपींनी पळ काढला होता. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवरतनगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अहोर्वा भवानी चौकात ही हत्या घडली. मृत शिक्षक सुनील भारती हे कुटुंबासह अहोर्व भवानी परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. सुनील जिल्ह्यातील सिंगपूर ब्लॉकमधील प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून होते. ते मूळ रायबरेली जिल्ह्यातील जगतपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सुदामापूर गावचे रहिवासी होते. सुनीलच्या कुटुंबात पत्नी पूनम भारती, मुलगी दृष्टी (5) आणि दोन वर्षांचा मुलगा होते.
पती, पत्नी आणि दोन मुलांची हत्या
आज, गुरुवारी सायंकाळी अचानक काही हल्लेखोर सुनील यांच्या घरात घुसले आणि त्यांनी अंदाधूंद गोळीबार सुरू केला. या घटनेत सुनीलसह त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी भवानी चौकातून पळून गेले. गोळ्यांचा आवाज ऐकून लोक घटनास्थळी पोहोचले. लोकांनी तत्काळ शिवरतनगंज पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.
आज जनपद अमेठी में हुई घटना घोर निंदनीय और अक्षम्य है।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) October 3, 2024
मेरी संवेदनाएं शोक संतप्त परिजनों के साथ हैं। दुःख की इस घड़ी में @UPGovt पीड़ित परिवार के साथ खड़ी है।
इस घटना के दोषियों को किसी भी कीमत पर बख्शा नहीं जाएगा, उन पर कठोरतम कानूनी कार्रवाई होगी।
सीएम योगींनी घेतली घटनेची दखल
घटनेची माहिती मिळताच अमेठीचे एसपी अनुप सिंहही घटनास्थळी पोहोचले. एसपींनी पोलिसांचे पथक तयार करून हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्याच्या सूचना दिल्या. सीएम योगी यांनीही या घटनेची दखल घेतली. मुख्यमंत्री योगी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून, अधिकाऱ्यांना तातडीने आरोपींना पकडून कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
हत्या का करण्यात आली?
पोलिसांच्या माहितीनुसार, मृत सुनील यांनी पोलिसांत एक तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीमुळे हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. त्या अँगलने सध्या तपास केला जात आहे.