धक्कादायक...! लोणीकाळभोर येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मुलासह मेव्हण्यावर चाकू हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 12:23 PM2019-06-14T12:23:54+5:302019-06-14T12:29:17+5:30
पती चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार त्रास देतो म्हणून आपल्या मुलासह पत्नी दोन दिवसांपूर्वी भावाकडे राहण्यासाठी आले होते.
लोणी काळभोर : कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पठारेवस्ती परिसरात पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीसह आपला ६ वर्षांचा मुलगा व मेहुण्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर त्याने स्वत:वरही वार करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. यामध्ये सहा वषार्चा मुलगा जागीच ठार झाला आहे.
या घटनेत आयुष योगेश बसेरे ( वय ६ )याचा मृत्यू झाला आहे. तर त्याची आई गौरी ऊर्फ किरण योगेश बसेरे (वय २६), मामा भारत उत्तम शिरोळे ( वय ३२, रा. तुळजाभवाणी मंदिरासमोर, पठारेवस्ती, लोणी स्टेशन, ता.हवेली) यांच्यावर प्राणघातक हल्ला करून योगेश परसराम बसेरे (वय ३५, रा. कदमवस्ती, ता. हवेली ) याने स्वत:वर वार करून घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे़ त्यात तोही गंभीर जखमी झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार त्रास देतो म्हणून गौरी या आपला मुलगा आयुष याच्यासमवेत दोन दिवसांपूर्वी आपला भाऊ भारत याचेकडे राहण्यासाठी आले होते.
भारत शिरोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवार ( १३ जून ) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास योगेश बसेरे तेथे आला. व मोठ्याने दरवाजा वाजवला. दरवाजा उघडलेनंतर त्याने मला पत्नी व मुलाशी बोलायचे आहे असे सांगून त्या दोघांना इमारतीच्या खाली असलेल्या पार्किंग मध्ये घेऊन गेला. ते बोलत असताना भारत जवळ उभे होते. रात्री ११ वाजून १० मिनिटे वाजण्याच्या सुमारांस त्याने अचानक आपल्या खिशातून चाकू काढला व मांडीवर खेळत असलेल्या आयुष याचे गळ्यावर मारला. हे पाहून गौरी जोरात ओरडली. त्याचवेळी त्याने तिच्या गळ्यावर वार केला. झालेल्या गंभीर जखमेमुळे दोघेही मायलेक खाली कोसळले. आपली बहीण व भाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आहेत हे पाहून भारत शिरोळे हे आपली आई समवेत धावत त्याठिकाणी गेले व त्याला पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी योगेश याने भारत यांचे गळयावर वार केला व तो तेथून निघून गेला.
हा प्रकार समजताच नजीकच्या लोकांनी त्या तिघांना उपचारासाठी तात्काळ लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे तपासणीनंतर आयुष याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दोघांवर उपचार सुरू असताना योगेश याने या तिघांवर हल्ला करून लोणी स्टेशन परिसरात स्वत:च्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यालाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिघांना पुढील उपचारासाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे नेण्यात आले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे - पाटील ( हवेली ), सचिन बारी ( दौंड ), पोलीस निरीक्षक सुरज बंडगर, दगडू हाके यांनी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर हे करत आहेत.