धक्कादायक ! व्याजाने घेतलेले पैसे दिले नाही म्हणून सावकाराने कर्जदाराला गाडीने उडविले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 02:34 PM2020-10-12T14:34:01+5:302020-10-12T14:34:44+5:30
पिंपरीतील घटना ; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
पिंपरी : व्याजाने दिलेले तीस हजार रुपये परत न देता पोलिसांत तक्रार केल्याचा राग आल्याने सावकाराने कर्जदाराला चारचाकी गाडीने उडविल्याची घटना पिंपरीत घडली. या प्रकरणी सवकारावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
सतीश एकनाथ नाणेकर (रा. सुंदरम बिल्डिंग, पिंपरी गाव, सध्या रा. महालक्ष्मी मंदिर समोर, पिंपरी गाव) असे आरोपीचे नाव आहे. तानाजी एकनाथ थोरात (वय ५४, रा. सुंदरम बिल्डिंग पिंपरी गाव) यांनी फिर्याद दिली आहे. थोरात यांनी आरोपी पूर्वी एकच इमारतीत राहत होते. त्यांनी आरोपीकडून तीस हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता. आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली होती. तसेच त्यांच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ केली होती. त्यामुळे फिर्यादीने पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याचा आरोपीला राग आला होता. फिर्यादी आठ ऑक्टोबरला कामावर जाण्यासाठी पिंपरीतील भिकू वाघिरे पुतळ्याजवळून सकाळी सहाच्या सुमारास पायी चालले होते. त्यावेळी थोरात यांना आरोपीने मोटार गाडीने ठोकर दिली. यात फिर्यादीच्या डाव्या मांडीचे हाड मोडले आहे.