धक्कादायक! एका आठवड्याभरात तब्बल १९ हत्या; 'या' देशात घडला थरकाप उडवणारा प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 05:56 PM2024-09-15T17:56:23+5:302024-09-15T17:58:18+5:30
19 Murders in one Week: देशांतर्गत हिंसा वाढत चालल्याचे चित्र अनेक देशांमध्ये दिसून येत आहे
19 Murders in one Week: जगभरात विविध देशांमध्ये युद्ध सुरु आहेत. काही देशांमध्ये उघड-उघड संघर्ष सुरू आहेत. तर काही देश एकमेकांच्या सीमारेषेत घुसखोरी करत शीतयुद्ध खेळत आहेत. असे असताना देशांतर्गत हिंसाही वाढत चालल्याचे चित्र अनेक देशांमध्ये दिसून येत आहे. मेक्सिको देशातील सिनालोआ प्रांतात सतत गोळीबाराच्या घटनांमुळे इंट्रा-कार्टेल युद्ध सुरू होण्याची भीती वाढली आहे. या भागातून नवनवीन हिंसाचाराची प्रकरे समोर आली आहेत. मेक्सिकन अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, एका आठवड्यात तब्बल १९ हत्यांची नोंद झाली आहे.
सिनालोआ प्रांतात आठवड्यातील सोमवार ते गुरुवार या दरम्यान १२ हत्यांची नोंद झाली. तर पुढील तीन दिवसात आणखी सात हत्येची नोंद झाल्याने ही संख्या १९ वर पोहोचली आहे. एका आठवड्यातील या प्रकारानंतर सिनालोआ प्रॉस्पेक्टस कार्यालयाने शुक्रवारी उशिरा एका निवेदनात म्हटले आहे की नवीन हत्यांची प्रकरणे चार वेगवेगळ्या ठिकाणी सापडली आहेत. कुलियाकनच्या राजधानीत दोन लोक ठार झाले आणि कॉनकॉर्डियाच्या नगरपालिकेत पाच जण ठार झालेत. निवेदनात असेही सांगण्यात आले आहे की, दोन्ही ठिकाणी गुन्हेगारी गटांमध्ये हिंसक घटना घडल्या आहेत.
सिनालोआ हा पॅसिफिक किनारपट्टीवरील शक्तिशाली ड्रग गँग सिनालोआ कार्टेलचा तळ आहे. या टोळीचा म्होरक्या एकेकाळी जोआक्विन “एल चापो” गुझमन होता. आता तो US मध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. जुलैमध्ये आणखी एक गुंड नेता इस्माईल “ईएल मेयो” झाम्बारा याच्या अटकेमुळे टोळीयुद्ध तीव्र होण्याची भीती निर्माण झाली. ती भीती आता खरी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.