आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 07:46 PM2021-02-10T19:46:27+5:302021-02-10T19:54:05+5:30
Minor girl Suicide Case : संशयिताला कोठडी : बलात्काराचे कलम वाढविले
जळगाव : प्रियकराकडून सतत चिडवले जात असल्याच्या नैराश्येत आत्महत्या केलेली १५ वर्षाची मुलगी तीन महिन्याची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, शवविच्छेदन करताना हा प्रकार उघडकीस आला असून पीडितेचा गर्भपात करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक केलेल्या अक्षय गोविंदा चोपडे (२८) व ऋषीकेश नारायण कोळी (२३,रा.नवी दाभाडी, ता.जामनेर) या दोघांना जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात बलात्कार व लैगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,८,११ (४) १२ आदी कलम वाढविण्यात आले आहे.
जामेनर तालुक्यात १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली होती. अक्षय गोविंदा चोपडे व ऋषीकेश नारायण कोळी हे दोन तरुण पीडितेला दोन महिन्यापासून चिडवत होते, सततच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे उघड झाले. तपासात दोघं जण तिच्या घराजवळ जावून चिडवत होते तर पीडिता हिने लाल शाईच्या पेनने वहिच्या पानावर ऋषीकेश हे नाव मराठीत तर ‘आय लव्ह यु’ असे इंग्रजीत लिहिले होते..त्यातही खाली ‘ऋषीकेश तुला माहित नसले मी तुझ्यावर किती प्रेम करते अन तुने जर मला विसरायची कोशिश केली तर...असे मराठीत लिहिलेले होते.
संशयिताची वैद्यकिय तपासणी होणार
मुलीने आत्महत्या केल्यानंतर अक्षय व ऋषीकेश या दोघांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार अक्षय याला ८ रोजी ११ वाजता तर ऋषीकेश याला बुधवारी दुपारी दोन वाजता अटक करण्यात आली. तपासाधिकारी राजेश काळे यांनी दोघांना जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी वकील भारती खडसे यांनी पीडितेवर अत्याचार झाल्याचे उघड झाले असून चौकशीसाठी दोघांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यावर दोघांना दोन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, शवविच्छेदन करताना पीडिता तीन महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यामुळे अटकेतील दोघांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून तेव्हाच नेमके कोणी शारीरीक संबंध केले हे स्पष्ट होणार आहे.