धक्कादायक! गस्तीवर असलेल्या पोलीसानेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 03:37 PM2019-02-05T15:37:47+5:302019-02-05T15:43:44+5:30
पालक आणि नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर पोलीस हवालदारावर कुरार पोलीस ठाण्यात पाॅक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. अटक पोलिसाचं नाव एस. परब असं आहे.
मुंबई - नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस शहरभर गस्तीवर असतात. मात्र, मालाड येथे गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदाराने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पालक आणि नागरिकांनी केलेल्या आंदोलनानंतर पोलीस हवालदारावर कुरार पोलीस ठाण्यात पाॅक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. अटकपोलिसाचं नाव एस. परब असं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परब हा मालाडच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर असलेल्या अदानी इलेक्ट्रिकसिटी कार्यालयासमोर असणाऱ्या पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनवर कार्यरत होता. पीडित मुलगी ही कुरार परिसरात राहते. रोज शाळेतून येता - जाता परब हा पूजाला पाहून अश्लील शेरेबाजी करायचा. मात्र पूजा दुर्लक्ष करायची. सोमवारी ती शाळेत निघाली असताना परबने तिला आपल्याकडे बोलावले. पूजा त्याच्याजवळ गेली तेव्हा त्याने तिला घट्ट पकडले. त्याने पूजा घाबरली व आरडाओरड करत तिने तिथून घरी पळ काढला. तिने पालकांना घडलेला प्रकार सांगितला. संतप्त पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलीस ठाण्यात फोन करत तक्रार केली. पूजाचे पालक, शेजाऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गोंधळ घातला होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यात लक्ष घातल्यावर कुरार पोलिसांनी परबवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. परबची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असल्याची माहिती कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदय राजेशिर्के यांनी लोकमतशी बोलताना दिली.