धक्कादायक! पतीकडून पत्नीची डोक्यात कुकर घालून हत्या, परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 06:05 PM2020-06-21T18:05:23+5:302020-06-21T18:08:07+5:30
रामेश्वरने खून पचवण्याच्या उद्देशाने पत्नी सारीकाने ओढणीने गळफास घेतल्याचा बनाव केला. यानंतर त्याने शहरातील एका खाजगी हॉस्पिटल येथे आणले, परंतू डॉक्टरांने तिचा मृत्यू झाल्याचे सांगून पोलिसांना याबाबत कळविले .
माजलगाव : शहरापासून जवळच असलेल्या भाटवडगाव येथील रामेश्वर प्रकाश तौर याने त्याची पत्नी सारिका तौर (वय24 ) हिच्या डोक्यात शनिवारी रात्री 12 वाजता जेवत असताना दोघात वाद होऊन त्यांने पत्नीच्या डोक्यात कुकर घातल्याने ती जागीच मृत्यू झाला. यानंतर तिचा पती स्वतःहून शहर पोलीस ठाण्यात हजर होऊन पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगत होता. परंतु पोलिसांनी घटनेची माहिती घेत खुनाचा गुन्हा दाखल केला.
येथील व्यापारी अशोक सक्राते यांच्या सारिका या मुलीचा चार वर्षांपूर्वी रामेश्वर तौर याच्याशी विवाह झाला होता. हे दाम्पत्य शहरानजिक असलेल्या भाटवडगांव वस्तीत त्यांच्या कुटूंबासह राहतात. शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास रामेश्वर जेवण करत असताना त्याचे पत्नी सारिका हिच्यासोबत भांडण झाले .यातच रामेश्वरने रागाच्या भरात सारिकाच्या डोक्यात कुकरचे भांडे मारल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. परंतू रामेश्वरने खून पचवण्याच्या उद्देशाने पत्नी सारीकाने ओढणीने गळफास घेतल्याचा बनाव केला. यानंतर त्याने शहरातील एका खाजगी हॉस्पिटल येथे आणले, परंतू डॉक्टरांने तिचा मृत्यू झाल्याचे सांगून पोलिसांना याबाबत कळविले .
पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच रामेश्वर स्वतःहून शहर पोलीस ठाण्यात आला व पत्नीने आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी करून पंचनामा केला व ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले. यावेळी सारिकाच्या डोक्यात मार असल्याचे दिसून आले त्यामुळे हा प्रकार वेगळाच असल्याचे पोलिसांना लक्षात आला. सारिकाचे वडील अशोक संक्राते यांच्या फिर्यादीवरून माजलगाव शहर पोलिसात पैशांची वारंवार मागणी केल्याप्रकरणी व खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड हे करत आहेत. मयत महिलेच्या डोक्याला खोलवर माराच्या जखमा झाल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन रुद्रवार यांनी दिली.