दिल्ली हादरली! चाकूचे ४० वार, मग दगडांनी ठेचून १६ वर्षांच्या मुलीची हत्या, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 01:32 PM2023-05-29T13:32:56+5:302023-05-29T13:38:24+5:30
Murder Video Viral: अंगावर काटा आणणारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये झाला कैद, आरोपी अटकेत
16 year old girl stabbed: नवी दिल्लीत अल्पवयीन मुलीच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्या व्यक्तीने 16 वर्षीय मुलीची चाकूने वार करत आणि दगडाने ठेचून हत्या केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, वाद सुरू असताना त्याने तरुणीला रस्त्यात थांबवले आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. मुलीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ इतका भयानक आहे की तो दाखवताही येऊ शकत नाही. दरम्यान, मुलीचा मारेकरी साहिल याला बुलंदशहर येथून अटक करण्यात आली आहे.
नक्की काय घडलं?
दिल्लीच्या बाहेरील उत्तरेला शाहबाद डेअरी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. एकाने पोलिसांना फोन करून मुलीवर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली आणि तातडीने घटनास्थळी येण्यास सांगितले. पोलीस पथकाने घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाची चौकशी केली. ही अल्पवयीन मुलगी रस्त्यावरून जात असताना अचानक एका मुलाने तिला अडवून तिच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याने मुलीला दगडाने ठेचून ठार केले.
हल्ल्याचे कारण काय?
पोलीस तपासात आरोपीचे नाव साहिल असून वडीलांचे नाव सर्फराज असल्याचे समोर आले. अल्पवयीन मुलगीही दिल्लीची रहिवासी होती. साहिल आणि ती मुलगी रिलेशनशिपमध्ये असल्याचे पोलिसांनी, मिळालेल्या माहितीनुसार सांगितले. प्रेम संबंधातील मतभेदामुळे रविवारी त्यांच्यात वाद झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यानंतर अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला जात असताना साहिलने तिला रस्त्यातच अडवले. दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने साहिलने मुलीवर चाकूने हल्ला केला.
आरोपी साहिल तरुणीवर चाकूने वार करत असल्याचे फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यावेळी लोक रस्त्यावरून ये-जा करताना दिसत होते. पण कोणीही हस्तक्षेप करायला तयार नव्हते. सतत चाकूने हल्ला करून साहिल घटनास्थळावरून फरार झाला. दुसरीकडे, जखमी मुलीला घटनास्थळावरून रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या वडिलांनी या संबंधी शाहबाद डेअरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. सध्या आरोपी साहिल फरार असून त्याच्या शोध सुरू आहे.