धक्कादायक! अमृतपालकडे बाजवांच्या मुलाचा पैसा; तो अॅक्टर फायनान्सर अन् पाकिस्तानी कनेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 13:53 IST2023-03-28T13:53:06+5:302023-03-28T13:53:58+5:30
सुरक्षा यंत्रणांनी अमृतपालची बँक खाती तपासण्यास सुरुवात केली होती. यातच अमृतपालचा एक जवळचा साथीदार पकडला गेला होता.

धक्कादायक! अमृतपालकडे बाजवांच्या मुलाचा पैसा; तो अॅक्टर फायनान्सर अन् पाकिस्तानी कनेक्शन
खलिस्तानी समर्थक अमृतपालने पंजाब पोलिसांना गुंगारा दिला आहे. तो आता कुठे आहे, पंजाब पोलिसांच्या नाकावर टिच्चून तो खुलेआम फिरत होता, पोलिसांना मारहाण करत होता. जेव्हा दबाव वाढला तेव्हा पोलिसांनी त्याच्यावर कारवाईला सुरुवात केली. तोवर हा दहशतवादी अमृतपाल पंजाबमधूनच पसार झाला आहे. आता पोलीस त्याच्या मागावर सीसीटीव्ही फुटेज तपासत फिरत आहेत. असे असताना अमृतपालचे पाकिस्तानी कनेक्शन उघड झाले आहे.
सुरक्षा यंत्रणांनी अमृतपालची बँक खाती तपासण्यास सुरुवात केली होती. यातच अमृतपालचा एक जवळचा साथीदार हा पाकिस्तानचे नुकतेच निवृत्त झालेले लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्या मुलाचाही खास असल्याचे समोर आले आहे. दलजीत कलसी हा अमृतपालचा फायनान्सर होता. धक्कादायक बाब म्हणजे तो साद बाजवा याची कंपनी कलसीला हे पैसे पुरवित होती, असा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे.
सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्य़ा रिपोर्टनुसार साद बाजवाची कंपनी दुबईत आहे. त्याच्या व्यतीरीक्त दिल्लीच्या सुभाष चौकातील एक मोठा फायनान्सर कलसीसाठी काम करत होता. कलसी हा दोन महिन्यांसाठी दुबईला गेला होता. तिथे त्याची राहण्याची सोय खलिस्तानी दहशतवादी लांडा हरिके याने केली होती. कलसी हा पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयच्या संपर्कात होता.
कलसीला नुकतेच पंजाब पोलिसांनी गुरुग्राममधून पकडले होते. तो चंदीगड येथे राहत होता. सध्या पंजाब पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी करून महत्त्वाची माहिती मिळवली आहे. कलसी हा अभिनेता आहे. त्याला अवैधरित्या पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची याचिका त्याच्या पत्नीने हरियाणा हायकोर्टात दाखल केली आहे.