Coronavirus : धक्कादायक! चोरीच्या संशयातून पकडलेला तरुण निघाला कोरोनाग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 06:56 PM2020-04-20T18:56:49+5:302020-04-20T19:00:01+5:30
Coronavirus : चोराला ताब्यात घेतलेल्या पोलीस आणि जीप चालकाला तातडीने क्वारंटाइन करण्यात आले आहे.
आग्रा - संबंध देशात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. चोरीच्या संशयाखाली ताब्यात घेतलेल्या तरुणाला कोरोना झाल्याचे समोर आले आहे. हरी पर्वत ठाण्यात याबाबतची माहिती मिळताच खळबळ माजली होती. चोराला ताब्यात घेतलेल्या पोलीस आणि जीप चालकाला तातडीने क्वारंटाइन करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी शाह मार्केट येथील दुकानाचा मालक आपल्या घरातील दुकानामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून दिसणारे दृश्य पाहत होता. त्यादरम्यान एक तरुण दुकानाबाहेर कुलूप तोडत असल्याचे दृश्य त्याला दिसले. चोरी आल्याच्या संशयाने त्याने तातडीने 112 क्रमांकावर संपर्क करीत पोलिसांना सूचना दिली. सूचना मिळताच पोलिसाने तरुणाना घटनास्थळी जाऊन ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीदरम्यान त्या तरुणाने सांगितले की, तो शाह मार्केटमधील एका दुकानात काम करतो आणि तो वजीरपुरा परिसरात राहणारा आहे. वजीरपुराचे नाव घेताच पोलीस दचकले. कारण कोरोना हॉटस्पॉटमध्ये वजीरपुर क्षेत्राचा समावेश आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात चोरीचा संशयाखाली गुन्हा दाखल केला आणि त्याला तातडीने कोरोनाच्या चाचणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. रविवारी रात्री आलेल्या चाचणीच्या निकालानुसार तो संशयित आरोपी कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले. यानंतर पोलीस ठाण्यात एकाच खळबळ माजली. या तरुणाला जीपमधून पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते आणि जीपमधून त्याला रुग्णालयात नेण्यात आले होते. यानंतर जीप चालक व पोलिसाला तातडीने क्वारंटाइन करण्यात आले आहे. पोलीस ठाणे देखील सॅनेटाइज करण्यात आले आहे.