धक्कादायक ! गावकऱ्याच्या छळामुळे पोलीस पाटील महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, आपबितीचा व्हिडीओ व्हायरल
By सुमेध उघडे | Published: December 10, 2020 06:29 PM2020-12-10T18:29:28+5:302020-12-10T18:31:02+5:30
पोलीस पाटील यांचा आपबिती कथन करणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
औरंगाबाद : गावातील वाघ कुटुंबाकडून माझा आणि माझ्या कुटुंबाचा तीन वर्षांपासून छळ सुरु आहे. या प्रकाराला पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ सुद्धा पाठीशी घालत आहेत असा आरोप करत पोलीस पाटील महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सिल्लोड तालुक्यात उघडकीस आला आहे. निर्मला बाळासाहेब हिवरे असे पोलीस पाटील महिलेचे नाव असून त्यांनी आत्महत्येचा पर्यंत करण्यापुर्विचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निर्मला बाळासाहेब हिवरे या सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील रहिवासी आहेत. त्या गावच्या पोलीस पाटील आहेत. गावातील रामदास वाघ त्याची आई मीरा आणि बहिण सुनिता हे निर्मला यांना तीन वर्षांपासून सतत त्रास देत आहेत. वाघ कुटुंब जाणीवपूर्वक शारीरिक, आर्थिक आणि मानसिक छळ करतात. रामदास वाघ पती घरी नसताना घरासमोर येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करतो. या प्रकाराला गाव सुद्धा पाठीशी घालत आहे. तसेच पोलिसांकडे रामदास वाघ यांनी खोट्या तक्रारी केल्या आहेत. पोलीस सुद्धा आमच्यावरील अन्यायाची दखल घेत नाहीत. या त्रास असहाय्य झाल्याने आत्महत्या करत आहे. याला गाव आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहे. माझ्यानंतर कुटुंबाला न्याय द्या, असा व्हिडीओ निर्मला हिवरे यांनी केला आहे. यानंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर सिल्लोड येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून निर्मला यांचा आपबिती कथन करणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
पोलिसात तक्रार केली नव्हती
निर्मला हिवरे यांनी झालेल्या प्रकारची पोलिसात तक्रार केली नव्हती अशी माहिती सिल्लोड पोलिसांनी दिली आहे. व्हायरल व्हिडीओची दखल घेऊन पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. दरम्यान, वडिलांच्या मृत्यूस हिवरे कुटुंब जबाबदार असल्याचा वाघ कुटुंबियांचा आरोप आहे. पोलीस तपासात यात काही निष्पन्न झाले नव्हते. मात्र, वाघ कुटुंब तेव्हापासून हिवरे यांना त्रास देत असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे.