धक्कादायक! रात्री साडे दहा वाजेपर्यंत सुरु होतं मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 08:29 PM2019-04-30T20:29:01+5:302019-04-30T20:31:53+5:30
निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे अनेक मतदार वंचित; 2 मशीनची गरज असताना एकच मशीनमूळे मतदारांना त्रास
नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील पेल्हार येथे रात्री उशिरापर्यंत मतदान चालू होतं या ठिकाणी सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी मतदानाला सुरुवात झाली. मशीन धीम्या गतीने चालत असल्याने मतदान करायला वेळ लागत होता. एका मतदाराला 15 मिनिटे असा वेळ लागत असल्याने मतदारांना सकाळपासून चार ते पाच तास रांगेत उभे राहावे लागले होते. पाणी आणि अन्नाशिवाय रांगेत उभे राहिल्याने काही जण कंटाळून मतदान न करता घरी निघून गेल्याचेही विश्वसनीय सूत्रांकडून कळते.
महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना चांगल्या प्रमाणे मतदान होत असल्याने राजकीय खेळी करून मतदारांना मतदान करण्यापासून मशीनच्या रूपाने रोखले असल्याचा आरोप नगरसेविका आणि वकील अंजली पाटील यांनी केला असून शासनाचा ढिसाळ कारभार या मतदान केंद्रावर दिसल्याचेही सांगितले. अधिकाऱ्यांना तक्रार करूनही त्यांच्याकडे कानाडोळा केला असल्याचाही आरोप केला आहे. तर ज्यांनी मतदान केले नाही किंवा मतदानापासून वंचित राहिले त्यांना मतदान करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
पेल्हार येथील मतदान केंद्रावर अतिशय संथ गतीने मतदान सुरू असल्याने मतदारांना दुपारपासून तीन तीन तास रांगेत उभे राहिल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी प्रकाश पाटील यांनी केला आहे. या मतदान केंद्रावर दोन मशीनची आवश्यकता असतानाही एकाच मशीनवर मतदान झाल्याने 6 वाजून गेल्यानंतरही मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या होत्या व रात्री साडे दहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते. मतदान यंत्रात काही वेळ बिघाड झाल्याच्या तक्रारी मतदारांनी केल्या पण बुथवरील अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते असे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी नालासोपारा मतदार संघ 132 चे मतदार नोंदणी अधिकारी अर्चना कदम यांना फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही.